Nagpur: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या किन्नरांची धरपकड, पाच महिन्यांत ८३ किन्नर गजाआड
By नरेश डोंगरे | Updated: May 16, 2025 00:10 IST2025-05-16T00:07:23+5:302025-05-16T00:10:54+5:30
Nagpur News: गेल्या पाच महिन्यांत ८३ किन्नरांना पकडून कोठडीत टाकण्यात आले.

Nagpur: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या किन्नरांची धरपकड, पाच महिन्यांत ८३ किन्नर गजाआड
नरेश डोंगरे, नागपूर: रेल्वे गाड्यांमध्ये शिरून प्रवाशांना पैशासाठी वेठीस धरणाऱ्या, त्यांचा अपमान करणाऱ्या किन्नरांविरुद्ध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, गेल्या पाच महिन्यांत ८३ किन्नरांना पकडून कोठडीत टाकण्यात आले आहे. या कारवाईमुळे किन्नरांमध्ये धावाधाव निर्माण झाली आहे.
रेल्वेगाडीच्या कोणत्याही डब्यात शिरायचे, प्रवाशांकडे पैशांची मागणी करायची आणि नाही दिले किंवा कमी पैसे दिले तर प्रवाशाचा त्याच्या नातेवाइकांसमोर अपमान करायचे, अशी किन्नरांची पद्धत असते. आप्तस्वकीयांसमोर अपमान करून घेण्यापेक्षा प्रवासी किन्नरांच्या हातात पाहिजे तेवढे पैसे ठेवतो.
दरम्यान, प्रवाशांसोबत अपमानजनक वर्तन केले तर हवे तेवढे पैसे मिळते, हे माहिती झाल्याने किन्नर जास्तच निर्ढावले असून त्यांचा उपद्रव जास्तच वाढला आहे. या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्याने दपूम रेल्वेच्या सुरक्षा दलाचे महानिरीक्षक मुनव्वर खुर्शिद आणि विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी किन्नरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली आहे. या पथकांवर किन्नरांना पकडून कडक कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या चार महिन्यांत दपूम रेल्वेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये ८३ किन्नरांना पकडण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून ८६००५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बोगस किन्नरांची वर्दळ
रेल्वेत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात, हे माहिती पडल्याने अनेक बोगस किन्नर रेल्वेत फेऱ्या करतात. अलिकडे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, हे बोगस किन्नर रेल्वेत प्रवाशांकडून पैसे मागत असल्याचे खऱ्या किन्नरांना दिसल्यास मोठा राडा होतो. खरे किन्नर बोगस किन्नरांवर तुटून पडतात. त्यांना बदड बदड बदडतात आणि रेल्वे गाडीतून पळवून लावतात. अशा प्रकारची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
त्या दोघांना अटक, अनेक सक्रिय
२ मे रोजी नागपूर-रायपूर ट्रेनमध्ये अशाच प्रकारे दोघांनी प्रवाशांना पैसे मागितले आणि नकार दिल्यानंतर त्यांच्याशी वाद घातला. या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर आरपीएफने त्यांना सालेकसाजवळ अटक करून गोंदिया पोलिसांच्या हवाली केले. मात्र, त्यांच्यासारखे अनेकजण रेल्वे गाड्यात सक्रिय आहेत.