आजोबांच्या भेटीला आलेल्या तरुणाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:24 IST2018-05-25T00:24:24+5:302018-05-25T00:24:42+5:30
आजोबांच्या भेटीला आलेल्या मूलताई येथील एका व्यापारी पुत्राचा कार अपघातात करुण अंत झाला. वृषभ मनीष पुगलिया (वय २०) असे मृताचे नाव असून, या अपघातात आदित्य ऊर्फ प्रिन्स प्रतापसिंग राठोड (वय २४, रा. शिवशक्तीनगर, मनीषनगर) आणि स्वप्निल भोजराज मेश्राम (वय २८, रा. रेल्वेकॉलनी, माऊंटरोड) हे दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला.

आजोबांच्या भेटीला आलेल्या तरुणाचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजोबांच्या भेटीला आलेल्या मूलताई येथील एका व्यापारी पुत्राचा कार अपघातात करुण अंत झाला. वृषभ मनीष पुगलिया (वय २०) असे मृताचे नाव असून, या अपघातात आदित्य ऊर्फ प्रिन्स प्रतापसिंग राठोड (वय २४, रा. शिवशक्तीनगर, मनीषनगर) आणि स्वप्निल भोजराज मेश्राम (वय २८, रा. रेल्वेकॉलनी, माऊंटरोड) हे दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर हा भीषण अपघात घडला.
मूलताई जैन समाजातील प्रतिष्ठित व्यापारी मनीष पुगलिया यांचा वृषभ एकुलता एक मुलगा होता. त्याचे आजोबा महेंद्र पुगलिया सूर्यनगरात राहतात. ते निवृत्त बँक अधिकारी आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी वृषभ बुधवारी नागपुरात आला होता. आजोबांना भेटल्यानंतर तो त्याचे मित्र आदित्य आणि स्वप्निलला भेटला. त्यानंतर बुधवारी रात्री हे तिघे आदित्यच्या कार (एमएच ३१/ ईए ६३७४) मध्ये बसून चहा नाश्ता करण्यासाठी रामदासपेठेत आले. येथे बराच वेळ गप्पा केल्यानंतर ते पहाटे ३.३० वाजता सदर परिसरात गेले. आदित्य कार चालवित होता. बाजूला स्वप्निल तर मागच्या सीटवर वृषभ बसला होता. जीपीओ चौकाकडून उच्च न्यायालयाकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता व्यवस्थित नाही. अशात कारचा वेग जास्त होता. त्यामुळे कार उच्च न्यायालयाच्या इमारतीजवळ अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. कारचा वेग अमर्याद असल्याने कारची मोठी मोडतोड झाली आणि तिघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती कळताच सदर पोलीस पोहचले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान वृषभने प्राण सोडला. या अपघाताची माहिती कळताच नागपूर आणि मूलताईच्या जैन समजात तीव्र शोककळा पसरली. स्वप्निल मेश्रामवर मेयोत तर आदित्य राठोडवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मेश्रामच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी दोषी कारचालक आदित्य राठोडविरुद्ध गुन्हा दाखल केला.