जयपूरच्या त्रिमूर्तीने सुशिक्षित बेरोजगारांना फसवले
By Admin | Updated: August 7, 2015 02:51 IST2015-08-07T02:51:43+5:302015-08-07T02:51:43+5:30
जयपूरच्या मे. एश्युअल प्लेसमेंट कंपनीच्या त्रिमूर्तीने अनेक शहरातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चुना लावला असल्याची बाब प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे.

जयपूरच्या त्रिमूर्तीने सुशिक्षित बेरोजगारांना फसवले
पोलिसांचा तपास सुरू: अनेक शहरांमध्ये पसरले आहे जाळे
नागपूर : जयपूरच्या मे. एश्युअल प्लेसमेंट कंपनीच्या त्रिमूर्तीने अनेक शहरातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना चुना लावला असल्याची बाब प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे. एश्युअल प्लेसमेंटचे आरोपी संचालक सुमित छाबरा, गिरीश बन्सल आणि विपुल भारद्वाज याच्या शोधासाठी अंबाझरी पोलीस जयपूरला जात आहे. अंबाझरी पोलिसांनी बुधवारी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
रामनगर चौक येथील एम. के. प्लेसमेंटचे संचालक आशिष गजभिये यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
त्यांच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०१३ मध्ये आरोपी सुमित छाबरा याने त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्याने गिरीश व विपुलला जयपूर, उज्जैन आणि बंगलुरु येथे ५० ते ७० इंजिनियरची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. निवड करण्यासाठी सेवा शुल्क घेतले जाईल असेही सांगितले होते. त्यानुसार एम.के. प्लेसमेंटने सुमितशी करार केला. त्यानुसार कॅम्पस इंटरह्यू घेऊन ४० उमेदवारांची निवड करण्यात आली. सुमित आणि त्याच्या साथीदारांनी विद्यार्थ्यांना ‘आॅफर लेटर’ देऊन जुलैमध्ये इंजिनियरिंगचा अंतिम निकाल आल्यावर नियुक्ती देण्याचे आश्वासन दिले.
परंतु निकाल लागल्यावरही नियुक्ती दिली नाही. दरम्यान इतर शहरातील विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याचे लक्षात आल्याने एप्रिल महिन्यात आशिष गजभिये यांनी आरोपीच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. गुरुवारच्या अंकात नकळतपणे एम.के. प्लेसमेंट अॅण्ड एज्युकेशन सर्व्हिसेस ही आरोपीची असल्याचे सांगण्यात आले होते. (प्रतिनिधी)