वाहतूक पोलिसांचा गुन्हेगारांवरही अंकुश, पाच आरोपी महिलांना अटक
By दयानंद पाईकराव | Updated: January 20, 2024 16:10 IST2024-01-20T16:09:38+5:302024-01-20T16:10:31+5:30
ही घटना शुक्रवारी १९ जानेवारीला सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास लिबर्टी चौकात घडली.

वाहतूक पोलिसांचा गुन्हेगारांवरही अंकुश, पाच आरोपी महिलांना अटक
नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचे काम वाहतूक पोलिस करीत असतात. परंतु शुक्रवारी मात्र एका महिलेची पर्स, दागीने आणि कागदपत्र घेऊन पळ काढत असलेल्या पाच महिलांना अटक करून गुन्हेगारांवरही वाहतूक पोलिस अंकुश लाऊ शकतात, हे सिद्ध केले आहे. ही घटना शुक्रवारी १९ जानेवारीला सकाळी ११.५० वाजताच्या सुमारास लिबर्टी चौकात घडली.
रश्मिका पवन नाळे (वय २८), अनु धिरज मानकर (वय २४), शिला गोविंद मानकर (वय ४०), पायल मोनू मानकर (वय ४०) आणि सुहासिनी आकाश लोंढे (वय ३०) सर्वजण रा. बुट्टीबोरी, पुलाचे खाली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. गुरप्रीतकौर जसपालसिंग रयत (वय ४५, रा. आस्था सोसायटी, टेकानाका, पाचपावली या आपल्या आईवडिलांना सोडण्यासाठी सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लिबर्टी चौकातल सिटी बसस्थानकावर आल्या होत्या. आई वडीलांना बसमध्ये बसवित असताना त्यांच्या आजुबाजुला असलेल्या पाच महिलांनी गुरप्रीतकौर यांच्या हँडबॅगची चेन उघडून त्यातील छोटी पर्स, कागदपत्र, लायसन्स व रोख १ हजार रुपये असा मुद्देमाल चोरी केला. चोरी झाल्याचे लक्षात येताच गुरप्रीतकौर यांनी आरडाओरड केली. यावेळी चौकात कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतूक पोलिसांनी शोधाशोध केली असता चोरी केलेल्या महिला एका बसमध्ये चढताना दिसल्या. लगेच वाहतूक पोलिस त्यांच्या मागोमाग बसमध्ये चढले. त्यांनी बसचे दार बंद करून बस थेट सदर पोलिस ठाण्यात आणली. तेथे आरोपी महिलांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तेथे पाचही महिला आरोपींविरुद्ध कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सदर वाहतूक विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र झरबडे, विनायक इंगळे, इंदल भजन, मंदा धुर्वे, प्रविण पांडे यांनी केली.