नागपुरात उपायुक्त साळींनी सांभाळले ट्रॅफिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 23:20 IST2020-02-29T23:19:15+5:302020-02-29T23:20:35+5:30
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली.

नागपुरात उपायुक्त साळींनी सांभाळले ट्रॅफिक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. साळी यांनी आज रीतसर वाहतूक शाखेचे कामकाज सांभाळले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत थेट डीवायएसपी म्हणून २०१० ला पोलीस दलात सहभागी झालेले विक्रम साळी २९ मार्च २०१९ ला नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झाले. आतापर्यंत ते पोलीस मुख्यालयाचा कार्यभार सांभाळत होते. मध्यंतरी त्यांना वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, ऐनवेळी परिमंडळ दोनची घडामोड झाल्याने त्यांना मुख्यालयात जैसे थे ठेवण्यात आले होते तर, उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता उपायुक्त पंडित नागपुरातून बदलून गेल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी साळी यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविली आहे.
दुचाकींचे शहर म्हणून नागपूर देशभरात ओळखले जाते. लाखोंच्या संख्येत येथे दुचाकी आहेत. त्यात नागपुरातील बेशिस्त ऑटोवाल्यांचा उर्मटपणा. रस्त्यावरून वाहने चालविणाऱ्यांनाच नव्हे तर पायी चालणाऱ्यांनाही बेशिस्त ऑटोचालक कमालीचा मनस्ताप देतात. विविध भागात सिमेंट रोड आणि मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतुकीला वारंवार अडसर निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, उपायुक्त साळी यांनी वाहतूक शाखेचा कारभार सांभाळला आहे. शनिवारी त्यांनी वाहतूक शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा करून एकूणच शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. शिस्तीत वाहन चालविणाºयांना पोलिसांकडून नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ड्रंकन ड्राईव्हसह वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. पदभार घेतल्यानंतर लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्तांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे ते म्हणाले.