मरणानंरही यातना संपेनात, घाटावरही वेटिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:44+5:302021-04-19T04:07:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० ...

मरणानंरही यातना संपेनात, घाटावरही वेटिंग!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात दररोज ८० ते ९० कोविड रुग्णांचा मृत्यू होत आहे. शहरात ४० ते ५० मृत्यू होत आहेत. त्यात अन्य आजारांनी, वृद्धावस्थेमुळे होणारे मृत्यू विचारात घेता दररोज १५० ते २०० मृत्यू होत आहेत. शहरात १६ घाट आहेत. यातील काही प्रमुख घाटावर दररोज ४५ ते ५० मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत आहेत. घाटावर अंत्यसंस्कारासाठी ओटे मिळत नसल्याने ओट्याखाली अंतिम संस्कार करावे लागत आहेत. घाटावरील चित्र मन हेलावणारे आहे.
शहरातील गंगाबाई, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम अशा प्रमुख घाटांवर प्रत्येकी ४५ ते ५० अंत्यसंस्कार केले जात आहेत. कोविड रुग्णावर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी सकाळपासून रात्रीपर्यंत व्यस्त असतात. त्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना अंत्यसंस्कारासाठी आणावे लागते. महापालिकेच्या १६ शववाहिका व खासगी १० शववाहिका आहेत. या कमी पडत असल्याने मृतदेहाचे वेटिंग सुरू आहे. मृतकांच्या नातेवाइकांना शववाहिकेची प्रतीक्षा करावी लागते. नाइलाजाने अॅम्ब्युलन्समधून मृतदेह घाटावर आणला तरी कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अंत्यसंस्कार करणाऱ्यांना बाधा होण्याचा धोका आहे.
.......
गृह विलगीकरणातील मृतकांना प्रतीक्षा
शासकीय व खासगी रुग्णालयात बेड मिळत नसल्याने गृह विलगीकरणात शहरात ५० हजारांहून अधिक कोविड रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात असताना उपचाराअभावी अनेकांचे बळी जात आहेत. अशा मृतकांवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शववाहिकेसाठी मनपाच्या वॉररूमला फोन केल्यानंतर तीन ते चार तासांनी शववाहिका येते. तोपर्यंत कोविड रुग्णाचा मृतदेह घरात पडून असतो.
...
लाकडाचा साठा मोजकाच
महिनाभरापासून मृतकांची संख्या दररोज वाढत असल्याने घाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध करताना मनपाच्या आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. महिनाभर पुरणारे लाकूड आठडाभरात संपत आहे. सध्या काही घाटांवर दोन-तीन दिवस पुरेल इतकाच लाकडाचा साठा आहे. खबरदारी म्हणून आधीच लाकूड मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
...
तातडीने ओटे उभारावे
शहरातील मृतकांचा आकडा विचारात घेता व कोविड संकट पुन्हा किती दिवस राहील, याची शाश्वती नसल्याने शरातील घाटावर मनपा प्रशासनाने नवीन ओटे बांधण्याची गरज आहे. तसेच नादुरुस्त ओटे दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे.