नागपुरात परत मुसळधार पाऊस; अनेक चौक, रस्ते जलमय, सखल भागात साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 16:40 IST2022-07-11T16:39:38+5:302022-07-11T16:40:19+5:30
काही तासांच्या उसंतीनंतर नागपुरात परत पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक चौक, रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

नागपुरात परत मुसळधार पाऊस; अनेक चौक, रस्ते जलमय, सखल भागात साचले पाणी
नागपूर : काल दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. तर संध्याकाळी साडे सात वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी शिरले. तर, आज काही तासांच्या उसंतीनंतर नागपुरात परत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक चौक, रस्ते जलमय झाले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचले असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
रविवारी आषाढीचा उत्सव आषाढातील पाऊससरींनी आनंददायी केला. काेवळ्या उन्हासह शांत असलेल्या ढगांनी दुपारी रंग बदलले अन् दिवसभर धाे-धाे बरसला. दिवसभर थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत हाेत्या. सायंकाळी काहीसा उसंत घेतल्यानंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली व रात्री ७.३० वाजेपासून पावसाची जाेर‘धार’ सुरू झाली. दरम्यान, सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही समाेर आल्या आहेत.
आषाढी, ईद आणि रविवार अशा एकत्रित सुटीमध्ये रिमझिम पावसाचा नागपूरकरांनी आनंद घेतला. सायंकाळी ४.३० नंतर पावसाने उसंत घेतली हाेती. त्यामुळे लाेक घराबाहेर पडले व वातावरणाचा आनंद घेतला. भुट्ट्यांच्या दुकानात चांगली गर्दी दिसून आली. दुसरीकडे फुटाळा तलावावरही लाेकांची गर्दी झाली हाेती. रिमझिम सुरू हाेताच काहींनी घर जवळ केले, तर काहींनी पावसाचे थेंब अंगावर झेलत सुटीचा आनंद घेतला. काही तासांच्या उसंतीनंतर आज पावसाने दुपारपासून पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
दरम्यान, राज्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. याचबरोबर, गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुढील २ दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे.