टूथपेस्ट, बाम आणि हेअर आॅईल ठरू शकतात मेंदूच्या विकारांना कारणीभूत!
By सुमेध वाघमार | Updated: July 25, 2025 18:47 IST2025-07-25T18:45:49+5:302025-07-25T18:47:11+5:30
डॉ. चंद्रशेखर मेश्राम : मेंदूतील न्यूरॉन्सना उत्तेजित करू शकतात

Toothpaste, balm and hair oil can cause brain disorders!
नागपूर : टूथपेस्ट, बाम आणि विविध हेअर आॅईल यांसारख्या दैनंदिन वापरातील उत्पादनांमधील काही घटक मेंदूतील न्यूरॉन्सना उत्तेजित करू शकतात आणि कालांतराने न्यूरोलॉजिकल रोगांच्या लक्षणांना हातभार लावू शकतात, असे महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बंगळुरूचे उप-अधिष्ठाता डॉ. थॉमस मॅथ्यू आणि वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
डॉ. मॅथ्यू यांच्यानुसार, डोकेदुखी आणि अपस्मार (मिरगी) सारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींनी ग्रस्त रुग्णांमध्ये केलेल्या क्लिनिकल निरीक्षणातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. विशेषत: हेअर आॅईलमधील कापूर आणि निलगिरी यांसारख्या घटकांमुळे अपस्माराच्या रुग्णांमध्ये झटके येण्याची शक्यता वाढतांना दिसून आले आहे. यात मेंदूतील न्यूरॉन्स वारंवार उत्तेजित होतात. २४ ते ४८ तासांच्या अंतराने हे घडल्यास मेंदूमध्ये अतिउत्साही न्यूरॉन्स, सर्किट्स आणि नेटवर्क तयार होतात. डॉ. मॅथ्यू यांच्या मते, हे बदल मायग्रेन आणि अपस्मार यांसारख्या विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतात.
टूथपेस्टचा वापर थांबवल्यास लक्षणे कमी
डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले की, अनेक डोकेदुखी आणि मायग्रेनचे रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, पण केवळ टूथपेस्टचा वापर थांबवल्याने किंवा ब्रँड बदलल्याने त्यांच्या लक्षणांमध्ये आराम मिळतो. ही लक्षणे फार कमी लोकांना दिसतात, परंतु त्यांची दखल घेणे महत्त्वाचे आहे. मायग्रेनच्या रुग्णांनी टूथपेस्ट आणि ओव्हर-द-काउंटर बामचा वापर बंद केल्यानंतर डोकेदुखीत लक्षणीय घट नोंदवली आहे. टूथपेस्टमध्ये असलेले नॅनो आणि मायक्रोप्लास्टिक्स मेंदूत जमा झाल्यामुळे विविध त्रास होऊ शकतात अशीही शक्यता व्यक्त केली जाते.
टूथपेस्ट व डोकेदुखीवर संशोधन आवश्यक
डॉ. मॅथ्यू यांच्या मते, टूथपेस्टला पाणी किंवा मिठाच्या पाण्यासारख्या निष्क्रिय पयार्यांनी बदलल्याने मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि चिंता यांसारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींचा भार कमी होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्यावर याचे महत्त्वपूर्ण परिणाम असल्याने या क्षेत्रात पुढील संशोधन आवश्यक आहे.
नियमित फ्लॉसिंगमुळे पक्षाघाताचा धोका २२ टक्क्याने कमी
अमेरिकेतील डॉ. सेन यांनी एका अभ्यासाचा उल्लेख केला आहे, ज्यात नियमित फ्लॉसिंगमुळे पक्षाघाताचा धोका सुमारे २२ टक्के कमी होतो असे नमूद केले आहे. दातातील रोगामुळे तोंडाच्या पोकळीत निर्माण होणारे दाहक सायटोकिन्स रक्तप्रवाहाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचून न्यूरोइंफ्लेमेशन करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, ३.५ अब्ज लोकांना तोंडाचा संसर्ग आहे. मौखिक आरोग्य हे न्यूरोलॉजिकल रोगाचे महत्त्वपूर्ण बायोमार्कर म्हणून काम करू शकते आणि मेंदूच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरू शकते. यावर प्रतिबंध आणि उपचार केल्यास अनेक न्यूरोलॉजिकल विकारांचा धोका कमी होऊ शकतो.