आज होणार शनी दर्शन

By Admin | Updated: May 10, 2014 01:12 IST2014-05-10T01:12:50+5:302014-05-10T01:12:50+5:30

आकाशगंगेत पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कालावधीत पृथ्वीपासून इतर ग्रहांचे अंतर कमी होते.

Today will be Shani Darshan | आज होणार शनी दर्शन

आज होणार शनी दर्शन

नागपूर : आकाशगंगेत पृथ्वी सूर्याभोवती फिरताना एका कालावधीत पृथ्वीपासून इतर ग्रहांचे अंतर कमी होते. शनिवार, १0 मे रोजी ही अवस्था पृथ्वी आणि शनीच्या बाबतीत निर्माण झाली आहे. या दोन्ही ग्रहांमधील अंतर कमी झाल्याने पृथ्वीवरून उघड्या डोळ्यांनी शनी दर्शन होणार आहे. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पूर्वेकडून शनीचा उदय होणार असून, निळ्या टिमटिमणार्‍या तार्‍याच्या खाली पांढर्‍या रंगाचा चकाकणारा हा ग्रह आकाशात बघता येईल. खगोल प्रेमींसाठी ही संधी असून, सर्वसामान्यांनाही शनी ग्रह अनुभवायला काहीच हरकत नाही, असे खगोल अभ्यासकांचे मत आहे.
शनीबाबत अनेक भ्रामक कल्पना सर्वसामान्यांमध्ये आहे. खगोल अभ्यासकांच्या मते आकाश गंगेतील ही एक प्रक्रिया आहे. सोनेरी रंगाचा हा ग्रह ग्रहमालिकेत वस्तुमान व आकारमानाच्या तुलनेत दुसर्‍या क्रमांकाचा आहे. दुर्बिणीतून याचे निरीक्षण केल्यास यातील सुंदर वलयाचा अनुभव घेता येईल. साधारणत: पृथ्वी आणि शनीतील अंतर ११ अँस्ट्रोनॉमिकल युनिट एवढे असते. एक युनिट म्हणजे १५ कोटी किलोमीटर एवढे असते. शनिवारी शनी हा ग्रह पृथ्वीपासून ८.८ अँस्ट्रोनॉमिकल युनिट एवढय़ा अंतरावर राहणार आहे. त्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी बघता येणार आहे. शनीबरोबरच गुरु आणि मंगळ ग्रह ही आकाशात दिसत आहे. आकाशात गुरु हा खूप जास्त चकाकणार्‍या तार्‍यासारखा व मंगळ हा लाल रंगाच्या चेंडूसारखा दिसतो आहे. दुर्बिणीतून गुरु ग्रहाचे फार चांगले आकलन करता येऊ शकते. दुर्बिणीतून तो पिवळसर रंगाचा दिसतो. फिक्कट गुलाबी रंगाचे पट्टे त्याच्यावर आहे. त्याचे चार चंद्रही बघता येतील. (प्रतिनिधी)

Web Title: Today will be Shani Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.