'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
By योगेश पांडे | Updated: September 27, 2025 15:04 IST2025-09-27T15:02:47+5:302025-09-27T15:04:54+5:30
तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक

'Today we are starting the Sangh', no announcement, no guests; This is how the Sangh started a hundred years ago
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २७ सप्टेंबर १९२५चा विजयादशमीचा दिवस अन् महालातील शुक्रवारी परिसरातील वाड्यात जमलेले काही मोजके तरुण... तेथे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी शब्द उच्चारले, 'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत' आणि देशातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. ना कुठली सार्वजनिक घोषणा, ना गाजावाजा, ना कुठले अतिथी. नागपुरात मुख्यालय असलेल्या व देशविदेशात विस्तार झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला तारखेनुसार शनिवारी सुरुवात होणार आहे.
मागील शंभर वर्षात संघाने अनेक चढउतार पाहिले व संघाचे स्वयंसेवक आज देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र संघाची सुरुवात अतिशय शांतपणे झाली होती. संघ स्थापनेच्य वेळी डॉ. हेडगेवार यांनी कुठलीही कार्ययोजनादेखील मांडली नव्हती.
२५ स्वयंसेवकांनी ठरविले संघाचे नाव
संघाची स्थापना झाली तेव्हा त्याचे नेमके असे नाव नव्हते. १७ एप्रिल १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात २५ सदस्यांनी चर्चा केली. पाचजणांनी जरीपटका मंडळ हे नाव असावे असे म्हटले, तर तिसरा पर्याय असलेल्या भारतोद्धारक मंडळाला कुणीही मत दिले नाही. २० जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाला समर्थन दिले व तेच नाव अंतिम झाले.
संघस्थापनेनंतर चार वर्षांनी हेडगेवार झाले सरसंघचालक
संघाची स्थापना १९२५ साली झाली असली तरी डॉ. हेडगेवार हे तब्बल चार वर्षांनी सरसंघचालक झाले. सुरुवातीपासून डॉ. हेडगेवार हे मार्गदर्शक होतेच. मात्र १० नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांना स्वयंसेवकांनीच सरसंघचालकपद स्वीकारण्याचा आग्रह केला व तो त्यांनी मान्य केला. बालाजी हुद्दार हे सरकार्यवाह तर मार्तंडराव जोग हे सरसेनापती झाले.
दंड चालविण्यापासून शारीरिक कार्यक्रमांची सुरुवात
संघाच्या कार्यप्रणाली शारीरिक कार्यक्रमांना महत्त्व आहे. याची सुरुवात तत्कालीन इतवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाली होती. तेथे संघाच्या स्वतःच्या शारीरिक कार्यक्रमांची सुरुवात झाली होती. याअंतर्गत अण्णा सोहोनी यांनी दंड चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले होते.
व्यायामशाळांतून स्वयंसेवकांचा शोध
त्याकाळी नागपूर व्यायामशाळा, महाराष्ट्र व्यायामशाळा येथे अनेक तरुण नियमितपणे जात होते. महाराष्ट्र व बंगालमध्ये व्यायामशाळा लोकप्रिय होत्या. त्यामुळे डॉ. हेडगेवार व त्यांचे सहकारी व्यायामशाळांमध्ये भेटी देऊन तेथील तरुणांना संघाशी जुळविण्यासाठी प्रयत्न करायचे.
१९२६ मध्ये नियमित झाल्या शाखा
आज देशभरात ८३ हजारांहून अधिक ठिकाणी दररोज शाखा लागतात. मात्र संघाची सुरुवात झाली तेव्हा पंथरा दिवसांतून एका स्वयंसेवक भेटायचे. संघाचे पहिले कार्यकारी सचिव रघुनाथराव बांडे यांनी संघाची स्थापना, बैठकीचे विस्तृत विवरण तसेच नामकरणाचे कार्यवृत्त तयार केले होते. ९ मे १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत स्वयंसेवकांनी १५ दिवसांतून एकदा भेटणे, व्यायामशाळा सुरू करणे या गोष्टी ठरविण्यात आल्या, तर २१ जून १९२६ रोजी अनाथ विद्यार्थी गृहात झालेल्या बैठकीत संघाच्या कार्यप्रणालीवर चर्चा झाली होती. २८ मेपासून मोहितेवाडा येथे संघाची शाखा नागपुरात नियमित लागायला लागली.