TMC leader's murder accused found in Hansapuri in Nagpur | नागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी

नागपुरातील हंसापुरीत सापडला टीएमसी नेत्याच्या खुनातील आरोपी

ठळक मुद्देचार महिन्यांपासून होता फरार : पश्चिम बंगालच्या हुगलीत झाली होती घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पश्चिम बंगालच्या हुगलीत टीएमसी नेत्याच्या खुनात फरार आरोपी मध्य नागपुरातील हंसापुरीत पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसिल पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्याला अटक केली.
मो. अकरम इसराईल (३३) रा. हुगली, पश्चिम बंगाल असे आरोपीचे नाव आहे. २९ जूनला हुगलीत टीएमसी नेता दिलीप राम यांचा गोळी घालून खून करण्यात आला होता. दिलीप रामची पत्नी हुगली ग्रामपंचायतची प्रमुख आहे. दिलीप हे टीएमसीचे नेते होते. त्यांच्या खुनानंतर हुगलीत तणाव निर्माण झाला होता. टीएमसी समर्थकांनी हुगली बंद करून भाजपा कार्यकर्त्यांवर दिलीप यांच्या खुनाचा आरोप लावला होता. आरोपींना त्वरित अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे पोलीस आयुक्तांची बदलीही करण्यात आली होती. अकरमचा एक नातेवाईक तहसिल पोलीस ठाण्याच्या परिसरात राहतो. दिलीपच्या खुनानंतर अकरम हुगलीतून फरार झाला. तो काही दिवस नातेवाईकांकडे लपला. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नातेवाईकांच्या घरी धाड टाकली. त्यांना आरोपी नाल साहब चौकाजवळ आढळला. अटक केल्यानंतर चौकशीत त्याने दिलीप राम खुनात फरार असल्याची कबुली दिली. तहसिल पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांना सूचना दिली आहे. ते येथे पोहोचल्यानंतर अकरमला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अकरम कुख्यात आरोपी असून त्याच्या विरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत. अकरम पूर्वीपासून टीएमसीशी निगडित होता. पश्चिम बंगालमध्ये राजकारणात सुरु असलेल्या घडामोडीतून यापूर्वीही अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. याच घडामोडीतून दिलीप राम यांचा खुन झाल्याची शंका आहे.

Web Title: TMC leader's murder accused found in Hansapuri in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.