नागपुरातील १५ हजार कपड्यांच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:38 IST2020-05-08T18:54:52+5:302020-05-08T22:38:42+5:30
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

नागपुरातील १५ हजार कपड्यांच्या कारागिरांवर उपासमारीची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. यात शहराच्या विविध भागात कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या १५ हजार कारागिरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जवळचे पैसे संपले, जेवणाची सोय नाही, घरभाड्यासाठी घरमालक तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
शहरातील शांतिनगर, पाचपावली, यशोधरानगर, लकडगंज आणि तहसिल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया नाईक तलाव, तांडापेठ, बंगलादेश, लालगंज, यशोधरानगर, पाचपावली, कुंदनलाल गुप्तानगर, झाडे चौक, मोमिनपुरा, गोंडपुरा, बस्तरवारी, टेका नाका, गुलशननगर, दलाल चौक, कमाल चौक, मोठा ताजबाग परिसरात कपड्यांच्या व्यवसायातील जवळपास १५ हजार कारागीर राहतात. हे कारागीर पश्चिम बंगालमधील नंदीग्राम जि. पूर्व मेदनीपूर येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या गावापासून १५०० किलोमीटर दूरवर ते आले आहेत. अनेकांनी भाड्याच्या जागेवर कारखाना सुरू केला तर अनेकजण या कारखान्यात कारागीर म्हणून कामाला आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडाला आहे. महिनाभरापासून हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच घरमालकही किरायासाठी तगादा लावत असल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
त्यामुळे राज्य शासन तसेच प्रशासनाने या कारागिरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लालगंज सुधार संघर्ष समितीने केली आहे. या अडचणीत सापडलेल्या कारागिरांना मदत करण्यासाठी लालगंज सुधार संघर्ष समितीचे अध्यक्ष गुणवंत झाडे, पदाधिकारी विलास पराते, विद्यासागर शाहू, दिनेश राऊत, नंदू वैरागडे, हरिभाऊ आमदरे, गोलू बोकडे, विलास धार्मिक, बंटी शेवडे यांनी पुढाकार घेतला. समितीने अनेक संस्थांच्या माध्यमातून या कारागिरांची भोजनाची व्यवस्था केली आहे. परंतु या कारागिरांची होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना त्यांच्या गावी पाठविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याची मागणी समितीने केली आहे.
व्यापाऱ्यांकडूनही पैसे मिळेना
कपड्याच्या व्यापाऱ्यांकडूनही त्यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे या कारागिरांचा नेता शहाजन खान यांनी सांगितले. नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावाकडे नातेवाईकही या कारागिरांची चिंता करीत आहेत.