टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2016 02:36 IST2016-06-20T02:36:50+5:302016-06-20T02:36:50+5:30
पैशाच्या देवाण-घेवाणबाबत वाद झाल्याने कोलकात्यातील अलिबाग येथून आलेल्या एका वृद्ध टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण
कळमन्यातील घटना : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून होता वाद
नागपूर : पैशाच्या देवाण-घेवाणबाबत वाद झाल्याने कोलकात्यातील अलिबाग येथून आलेल्या एका वृद्ध टिंबर व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी कळमना येथील न्यू माँ उमिया औद्योगिक वसाहत येथे घडली.
शालिकराम बुरहू शुक्ला (६८) रा. बहुजी हट्टी हातीपारा रोड अलिबाग कोलकाता असे पीडित टिंबर व्यापाऱ्याचे नाव आहे. आरा मशीन मालक परवेज भाई आणि कार चालक प्रमोद ऊर्फ गुड्डू ठाकूर (एजंट) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार शालिकरामच्या मुलाकडून आरोपींना १५ ते २० लाख रुपये घ्यायचे होते. परंतु त्यांचा मुलगा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. गुरुवारी शालिकराम त्यांना कापसी येथे भेटले. त्यांनी पैशाची मागणी केली.
तेव्हा आपल्या मुलाच्या देवाण-घेवाणीबाबत आपला कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांना गालावर थापड मारली. नंतर सायंकाळी ४.३० वाजता आरोपी शालिकरामला एमएच/४९/६१५७ क्रमांकाच्या गाडीत बळजबरीने बसवून परवेजच्या कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले. तिथे त्यांना मारहाण केली. यात शालिकराम जखमी झाले. यानंतर कंपनीच्या एका खोलीत त्यांना बंद करून ठेवले.
इकडे शालिकराम यांना बळजबरीने गाडीत बसवतांना त्यांच्या काही व्यापारी मित्रांनी पाहिले होते. परवेजच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनीच त्यांना सोडविले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)