Tiger drowned in Bihara mine in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बिहाडा खाणीत वाघाचा बुडून मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील बिहाडा खाणीत वाघाचा बुडून मृत्यू

ठळक मुद्देरामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट मधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर (रामटेक) : रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीच्या खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शनिवारी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. वाघाचा मृतदेह खाणीमधून काढण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत. रविवारी या वाघाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. वाघ बुडाला तो खाणीचा खड्डा ५५ फूट खोल असून त्यामध्ये २५ फूट पाणी असल्याचे सांगण्यात येते. रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत संरक्षित वनक्षेत्रात इंग्रजांच्या काळात मॅगनीजच्या खाणी अस्तित्वात होत्या. त्या काळात जंगलातील या खाणीमधून मॅगनीज काढले जायचे. परंतु केलेले खड्डे बुजविले न गेल्याने ते आजही अस्तित्वात आहे. या खड्ड्यांमध्ये बाराही महिने पावसाचे पाणी साचून असते. अशाच एका खड्ड़्यात मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक२९३ मध्ये बिहाडा खाणीत शनिवारी पट्टेदार वाघ मृतावस्थेत पाण्यावर तरंगत असलेला दिसून आला. वनरक्षक राजीव उईके, वनमजूर भोंडेकर आणि क्षेत्रसहायक श्रीकांत चौगुले हे गस्तीवर असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. या चमूने रामटेकचे वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे यांना ही माहिती दिली. वरिष्ठांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली असता सहायक वनसंरक्षक संदीप गिरी, मानद वन्यजीवसंरक्षक कुंदन हाते तसेच रामटेक वनपरिक्षेत्राधिकारी रवींद्र शेंडे घटनास्थळी दाखल झाले.
वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांच्यानुसार सदर वाघ शिकारीसाठी एखाद्या जनावराच्या मागे जोरात धावला असेल व अंदाज न आल्याने तो घसरुन खाणीतील पाण्यात पडला असावा असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. वाघाच्या अंगावर काही जखमा देखील आढळल्याचे शेंडे यांनी सांगितले. सदर घटना एक ते दोन दिवस अगोदरची असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वाघाचे नेमके वय किती असावे याविषयी त्यांनी असा अंदाज वाघ पाण्यात फुगल्याने करता येत नसल्याचे सांगीतले. रविवारी या मृत वाघाची उत्तरीय तपासणी केली जाईल. उत्तरीय तपासणीनंतरच तथ्य बाहेर येईल. वन्यप्राण्यांच्या अपघातांना निमंत्रण देणारे खाणींचे हे खड्डे स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षात बुजविणे शक्य नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Web Title: Tiger drowned in Bihara mine in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.