तिकिटांचा काळाबाजार
By Admin | Updated: May 12, 2014 00:56 IST2014-05-12T00:56:00+5:302014-05-12T00:56:00+5:30
उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यांमध्ये वेटींग आहे. यामुळे प्रवासी दलालांकडे जाऊन तिकिटाची खरेदी करीत आहेत.

तिकिटांचा काळाबाजार
नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यांमध्ये वेटींग आहे. यामुळे प्रवासी दलालांकडे जाऊन तिकिटाची खरेदी करीत आहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजता रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागातील आरक्षण कार्यालयात आलेल्या एका दलालाला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. उन्हाळ्यात सर्वच रेल्वेगाड्यात वेटींगची स्थिती पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणारे प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत. रविवारी अमर अशोक गवळी (३०) रा. कुंभारपुरा संत्रा मार्केट हा रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा दलाल नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात आला. तेथे त्याने नागपूर -मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासाचे एसी ३ कोचचे ३ तात्काळ तिकीट खरेदी केले. त्यानंतर त्याने मुंबई-नागपूर प्रवासाचे स्लिपरक्लासचे आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे स्लिपरक्लासचे तिकीट असे एकूण ८ हजार २८५ रुपये किमतीची रेल्वे प्रवासाची तिकिटे खरेदी केली. ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विनोद राठोड, विकास शर्मा, सुशील मलिक, भगवान लेंडे यांनी या दलालावर पाळत ठेवली. तो तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी तिकीट खरेदी करीत असल्याची शंका बळावल्यानंतर त्यांनी या दलालास खरेदी केलेली रेल्वे प्रवासाची तिकिटे आणि आरक्षणाचे कोरे अर्ज यासह अटक केली. त्याच्याजवळून १ मोबाईल, १५० रुपये रोख जप्त करण्यात येऊन त्याचे विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर या दलालास रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)