तिकीट एजंटला जुन्या पार्टनरची मारहाण, जिवे मारण्याची धमकी
By योगेश पांडे | Updated: May 16, 2024 18:16 IST2024-05-16T18:15:45+5:302024-05-16T18:16:36+5:30
Nagpur : रेल्वे तिकीट बुकिंग एजंटला त्याच्या जुन्या पार्टनरनेच पैशांसाठी केली मारहाण

Ticket agent beaten up by old partner, threatened with death
नागपूर : एका रेल्वे तिकीट बुकिंग एजंटला त्याच्या जुन्या पार्टनरनेच पैशांसाठी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
चंद्रशेखर सरदार (३८, धामना, अमरावती रोड) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांच्याकडे रेल्वे तिकीट बुकिंगची एजन्सी असून हजारीपहाड येथे कार्यालय आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत सुरेश सागर तलवार (४५, साईनगर, दाभा) याच्यासोबत सरदार प्रॉपर्टी डीलिंग व गाडी बुकिंगचे काम करायचे.
२०१८ साली त्यांनी हरिद्वारसाठी ग्राहकांकडून १.४० लाख रुपये घेतले व तेथील तुषार नाथ नावाच्या व्यक्तीकडे बुकिंगसाठी पैसे दिले. मात्र, तुषारने तिकीट काढून न देता पैसे स्वत:जवळच ठेवले. सरदारने स्वत:जवळील पैसे ग्राहकांना दिले. तुषारने दोनदा सरदार यांना धनादेश दिले. मात्र, दोन्ही वेळा ते वटलेच नाही. त्यामुळे सरदार यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. तुषारने खटला मागे घेण्याची विनंती करत डीडीद्वारे १.४० लाख रुपये परत देण्याची तयारी दाखवली. १५ मे रोजी अचानक सुरेश तलवार हा त्याचा साथीदार अशफाक खान जीमल खान (३५, गिट्टीखदान) याच्यासोबत सरदार यांच्या कार्यालयात आला. तुषारकडून आलेले पैसे मागितले. सरदार यांनी ते पैसे त्यांचे असल्याचे म्हटल्यावर तुषार व अशफाकने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत त्यांची सोन्याची चेनदेखील हरविली. जखमी अवस्थेतच सरदार यांनी गिट्टीखदान पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी तलवार, अशफाक व त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.