जुना बगडगंजमध्ये थरार; कट मारल्याचा जाब विचारल्याने तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 18:03 IST2022-10-29T18:02:44+5:302022-10-29T18:03:46+5:30
दोन आरोपींना लकडगंज पोलिसांनी केली अटक

जुना बगडगंजमध्ये थरार; कट मारल्याचा जाब विचारल्याने तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न
नागपूर : कट का मारला? असा जाब विचारल्याने संतप्त पाच आरोपींनी तिघांवर हल्ला करून तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ९:३० ते ९:४० वाजताच्या सुमारास घडली आहे.
कार्तिक सुरेश रोकडे (२४, जुना बगडगंज, दादाजी धुनिवाले चौक) यांच्या घरी त्यांच्या मोठ्या वडिलांची मुले पीयूष धनराज रोकडे (२८), नितीन धनराज रोकडे (३१) (दोन्ही रा. म्हाळगीनगर, विठ्ठलवाडी) हे कार्यक्रमासाठी आले होते. कार्तिक हे घरासमोर रस्त्यावर बोलत असताना आरोपी आयुष ऊर्फ लक्की अशोक चौरसिया (२१), रोशन जुगल श्रॉफ (२०) यांच्या गाडीचा कट कार्तिकला लागला. कार्तिकने त्यांना हटकले असता त्यांच्यात वाद होऊन आरोपी शिवीगाळ करून निघून गेले. थोड्या वेळानंतर आरोपी अशोक सोमाजी चौरसिया (५१), गोलू श्रीवास (२५), निखिल चौरसिया (२२) (सर्व जण रा. जुना बगडगंज, धावडे मोहल्ला) यांना घेऊन कार्तिकच्या घरासमोर आले. त्यांनी कार्तिकशी वाद घालून मारहाण केली.
कार्तिकचा भाऊ पीयूष रोकडे भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपी आयुषने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला तर आरोपी निखिलने हातबुक्क्यांनी त्यास मारहाण केली. कार्तिकचा दुसरा भाऊ नितीन भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्या डोक्यावर, डोळ्याजवळ तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्तिकने दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आयुष, रोशन आणि गोलूला अटक केली आहे.