पासपोर्ट पोलीस पडताळणीतून तीन नियम हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:12 IST2019-07-31T11:10:22+5:302019-07-31T11:12:27+5:30
पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अर्जदाराला फोटो, पत्ता आणि स्वाक्षरीच्या तपासणीसाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. या तीन नियमांना पोलीस पडताळणी फॉर्मेटमधून हटविले आहे.

पासपोर्ट पोलीस पडताळणीतून तीन नियम हटविले
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अर्जदाराला फोटो, पत्ता आणि स्वाक्षरीच्या तपासणीसाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. या तीन नियमांना पोलीस पडताळणी फॉर्मेटमधून हटविले आहे.
पोलीस पडताळणी फॉर्मेटमध्ये आतापर्यंत नऊ नियमांचा समावेश होता. त्यापैकी तीन हटविण्यात आले असून, आता सहा नियम राहिले आहेत. क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी सी.एल. गौतम यांनी सांगितले की, हटविलेल्या तीन नियमांची पडताळणी पासपोर्ट कार्यालयातर्फे करण्यात येते. त्यामुुळे पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या तीन नियमांची अनिवार्यता समाप्त करण्यात आली आहे.
पण विशेष आणि संदिग्ध स्थितीत पोलीस कार्यालयीन अहवालात आपला पडताळणी अहवाल सहभागी करू शकतात. तीन पैलूंची अनिवार्यता समाप्त केल्यामुळे अर्जदाराला पोलिसांकडे किंवा पोलिसांना अर्जदारांच्या घरी जावे लागणार नाही.
केंद्रात अर्जदारांच्या संख्येत घट
सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात (पीएसके) अर्जदारांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. दीड वर्षांपूर्वी दररोज जवळपास ७०० अर्ज यायचे. पण ही संख्या आता कमी होऊन ३५० वर आली आहे. विदर्भाच्या १० जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे अर्जदार कमी झाले आहेत. अकोला आणि अमरावती येथे दररोज प्रत्येकी ५० अर्जाऐवजी मर्यादा २५० अर्जापर्यंत वाढविण्यात येणार आहे. अशास्थितीत नागपुरातील पीएसकेमध्ये अर्जाच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
पोस्ट ऑफिसला देणार लीज लाईन
पासपोर्ट सेवा देणाºया विदर्भातील पोस्ट ऑफिसला बीएसएनएलची लीज लाईन देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जावर प्रक्रिया वेगाने होईल. सध्या अनेक पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात फोटो योग्यरीत्या स्कॅन होत नाही तर कुठे फाईलचा शोध लागत नाही. अशावेळी अर्जदाराला नागपुरात यावे लागते. त्यात त्यांचा वेळ जातो आणि पैसा खर्च होतो. पण लीज लाईनमुळे अर्जदारांना नागपुरातील सेवा केंद्रात यावे लागणार नाही. पण आवश्यक चौकशीसाठी त्यांना पासपोर्ट कार्यालयात यावेच लागेल.
सध्या विदर्भातील पोस्ट ऑफिसमध्ये बीएसएनएलच्या ब्रॉडब्रॅण्ड कनेक्शनने काम होत आहे. त्यामुळे अनेकदा फोटो आणि कागदपत्रांच्या स्कॅनिंगमध्ये अडचण येत आहे. या कामासाठी जवळपास चार ते पाच दिवस लागतात. त्यानंतर फाईल तयार झाल्यानंतर नागपुरात पाठविण्यासाठी आणखी दोन दिवस लागतात. अशाप्रकारे पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर ग्रॅन्टिंग होईपर्यंत जवळपास आठ दिवसांचा कालावधी लागतो.
अर्जदारांना लवकर पासपोर्ट मिळावा या उद्देशाने पोस्ट ऑफिसमध्ये सेवा केंद्र सुरू केले आहे. पण ऑनलाईन कामाची गती धीमी असल्यामुळे अर्जदारांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. विदर्भात अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, वर्धा, गोंदिया, भंडारा, बुलडाणा येथे पोस्ट ऑफिस सेवा केंद्र सुरू आहेत. यातील गोंदिया आणि भंडारा येथे एकाच जिल्ह्याच्या स्वरुपात एक पीओपीएएस देण्यात आले आहे.