वारंवार ‘सिक लिव्ह’, नागपुरातील तीन पोलीस उपनिरीक्षक निलंबित; असा उघड झाला संपूर्ण प्रकार
By योगेश पांडे | Updated: April 25, 2025 01:12 IST2025-04-25T01:10:13+5:302025-04-25T01:12:13+5:30
विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस ठाण्याला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता...

वारंवार ‘सिक लिव्ह’, नागपुरातील तीन पोलीस उपनिरीक्षक निलंबित; असा उघड झाला संपूर्ण प्रकार
नागपूर : कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर न करता वारंवार ‘सिक लिव्ह’ घेणे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन उपनिरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशांवरून तीनही उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांनी बुधवारी पोलीस ठाण्याला अचानक भेट देत पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता.
निशा गवळी, महेश पवार व वैशाली सोळंके अशी कारवाई झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील कारभाराची चाचपणी केली. तसेच तक्रारदारांशीदेखील संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीबाबतदेखील पाहणी केली. काही अधिकारी ‘सिक लिव्ह’ घेऊन कामावर गैरहजर असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. पोलीस आयुक्तांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तीनही उपनिरीक्षकांनी ‘सिक लिव्ह’वर जाताना कुठलीही वैद्यकीय कागदपत्रे सादर केली नव्हती. अधिकारी कर्तव्य टाळण्याच्या उद्देशाने जाणुनबुजून ‘सिक लिव्ह’ घेत असल्याची बाबदेखील यातून समोर आली.
एकीकडे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असताना काही अधिकारी असे वागत असतील तर ते अयोग्य आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी त्यांचे तातडीने निलंबन करण्याचे आदेश जारी केले. भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीखपवून घेतला जाणार नाही. प्रत्येक अधिकारी व अंमलदारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, अन्यथा कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.