बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 15:39 IST2022-03-07T15:38:43+5:302022-03-07T15:39:05+5:30
वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते.

बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात
नागपूर : बिबट्याच्या चामड्याची विक्री करणाऱ्या तिघांंना रविवारी सकाळी चामड्यासह अटक करण्यात आली. वन विभागाच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणले. विशेष म्हणजे तब्बल आठ दिवस हे पथक त्याच्या मागावर होते.
वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. त्यासाठी एक बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ज्या ठिकाणी हा व्यवहार होणार होता, त्या ठिकाणावर हे पथक लक्ष ठेऊन होते. मात्र संबंधित आरोपींनी सातत्याने ठिकाणे बदलली. अखेर सोमवारी हा व्यवहार ठरला. त्यानुसार, बनावट ग्राहकाकडून आरोपीसोबत संपर्क साधून बोलणी करण्यात आली.
कापसी खुर्द येथील जय उमिया रोड लाईन्स या दुकानात व्यवहार ठरला. या नुसार व्यवहाराची बोलणी सुरू असतानाच पथकाने धाड घालून संजीव डमरूधर बेहरा (४२, नागपूर), नरेश तेजराम दरोडे (४८, नागपूर) या दोघांना ४ फुट लांब आणि १.५ फुट रुंदीच्या चामड्यासह अटक केली. नंतरच्या चौकशीत प्रवीण श्रीराम लांजेवार (४५, नागपूर) यालाही अटक करण्यात आली. या सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक वनसंरक्षक एन. जी. चांदेवार यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.