नागपुरात फॉगिंगच्या तीन मशीनला ड्रायव्हर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:08 AM2020-03-25T00:08:56+5:302020-03-25T00:10:13+5:30

अधूनमधून पाऊस येत असल्याने शहरात सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागाकडे १० फॉगिंग मशीन आहेत. परंतु तीन मशीनला ड्रायव्हर नसल्याने वापरता येत नाही तर एक दुरुस्तीला टाकली आहे.

Three fogging machines in Nagpur have no driver | नागपुरात फॉगिंगच्या तीन मशीनला ड्रायव्हर नाही

नागपुरात फॉगिंगच्या तीन मशीनला ड्रायव्हर नाही

Next
ठळक मुद्देसहा मशीनचा वापर : तीन मशीनला ड्रायव्हर नाही: मागणी वाढूनही मशीन मिळत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधूनमधून पाऊस येत असल्याने शहरात सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील नागरिक त्रस्त आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने नगरसेवकांची फॉर्गिंगची मागणी वाढली आहे. मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागाकडे १० फॉगिंग मशीन आहेत. परंतु तीन मशीनला ड्रायव्हर नसल्याने वापरता येत नाही तर एक दुरुस्तीला टाकली आहे. त्यातच तरतूद कमी असल्याने पुरेसे डिझेल मिळत नाही. त्यामुळे मागणी असूनही वेळेवर मशीन उपलब्ध करण्यात विभागाला अडचणी येत आहेत.
डासांचा आणि कोरोनााचा संबंध नाही. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फॉर्गिंग मशीनची मागणी वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजारात फॉगिंग केले जाते. सध्या एका प्रभागात फॉगिंग करावयाचे झाल्यास सहा दिवस लागतात. एक मशीन आमदार निवास परिसर व सिव्हील लाईन भागात कार्यरत असल्याची माहिती हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे यांनी दिली.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यात ताप येऊन कोरडा खोकला येतो. गळ्यात त्रास होतो. डेंग्यूमध्ये सुद्धा ताप येतो. डेग्यूवर कोणत्याही प्रकारचे व्हॅक्सिन नाही. त्यामुळे डासांचा प्रकोप रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. असे असतानाही फॉगिंग मशीनला डिझेल उपलब्ध होत नसल्याने तीन तासाऐवजी दोन तास एक मशीन फॉगिंग करीत आहे. यामुळे फॉगिंगला मर्यादा आल्या आहेत.

फॉगिंग करण्याचे महापौरांचे आदेश
शहरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून तातडीने सर्व झोन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्र परिसरात फॉगिंग करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांना दिले
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा झटत आहे. परंतु फॉगिंग बंद असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमतने प्रकाशित करताच मनपाची यंत्रणा जागी झाली. महापौरांनी याची दखल घेत फॉगिंग करण्याचे निर्देश दिले.’ फॉगिंग बंद असल्याने याच दरम्यान शहरात मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे मलेरिया आणि इतर रोगांची शक्यताही बळावली आहे. कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे मच्छरांची संख्या वाढत आहे. धंतोली, रामदासपेठ या भागात सर्वाधिक रुग्णालये आहेत. या भागालाही वाढत्या मच्छरांचा त्रास सतावत आहे. भांडेवाडी परिसरात डम्पिंग यार्ड असल्याने दुर्गंधी सोबतच मच्छरांचाही त्रास नागरिक सहन करीत आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांसोबतच झोपडपट्टी परिसरातही हा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये फवारणीसाठी मलेरिया-फायलेरिया विभागाकडे फॉगिंग मशीनची मागणी केली. मात्र, पेट्रोल-डिझेल नसल्याचे कारण पुढे करून विभागाने फॉगिंग मशीन देण्यास नकार दिला, ही गंभीर बाब असल्याचे सांगत संपूर्ण झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात, मच्छरांच्या उत्पत्ती स्थानांवर औषध फवारणी करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी आरोग्य विभाग (स्वच्छता) तसेच मलेरिया-फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना दिले आहेत.

 

Web Title: Three fogging machines in Nagpur have no driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.