कारचा टायर फुटून भीषण अपघात; पती, पत्नी व मुलगा जागीच ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 16:01 IST2022-02-12T13:47:15+5:302022-02-12T16:01:29+5:30
अकोलाकडून जबलपूरकडे भरधाव वेगात जाणारी कार टायर फुटल्याने कोंढाळीपासून काही अंतरावर निर्मल सुतगिरणीजवळ उललटी. यात पती, पत्नी व तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला असून चालक महिला गंभीर जखमी झाली आहे.

कारचा टायर फुटून भीषण अपघात; पती, पत्नी व मुलगा जागीच ठार, एक गंभीर जखमी
नागपूर : भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पती, पत्नी व तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमरावती कोंढाळी मार्गावर निर्मल सुतगिरणीजवळ आज (दि. १२) दुपारी १ च्या सुमारास घडली.
अनुपम विनोदकुमार गुप्ता (वय ५०) त्यांची पत्नी रेनु अनुपम गुप्ता (वय ४५), मुलगा अक्षद अनुपम गुप्ता (वय २७) सर्व रा. जबलपूर मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे असून कारचालक व अनुपम गुप्ताची बहिण अर्चना संदिप अग्रवाल (वय ५७) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सदर कार (एमपी २० सीएच ३०४१) ही अकोला येथुन नागपूर मार्गे जबलपूरकडे जात होती. दरम्यान, कोंढाळी अमरावती मार्गावर कोंढाळीपासून २ किमी अंतरावर निर्मल सुतगिरणीजवळ कारच्या समोरील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने कारचालक अर्चना अग्रवाल यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रोड दुभाजकावरून उसळून तीन पलटी खात पुन्हा उभी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पार चुराडा झाला. तर, तिघांही मृतकांचे डोके चेंदामेंदा होवून मेंदू बाहेर आले होते.
माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना अग्रवाल यांना उपचारार्थ नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. दरम्यान, कोंढाळी अमरावती मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. कोंढाळी पोलिसांनी तिघांचे मृतदेह कारबाहेर काढून शवविच्छेदन करीता काटोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
घटनास्थळी काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव व राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलांचे उप अधिक्षक संजय पांडे व शरद मेश्राम यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास कोंढाळी पोलीस तपास करीत आहे.