छत्तीसगड एक्स्प्रेसमधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 20:57 IST2020-11-28T20:54:30+5:302020-11-28T20:57:30+5:30
Nagpur News corona छत्तीसगड एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेले तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली.

छत्तीसगड एक्स्प्रेसमधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्तीसगड एक्स्प्रेसने प्रवास करीत असलेले तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. महापालिकेच्या पथकाने तिन्ही प्रवाशांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
रेल्वेगाडी क्रमांक ०८२३८ अमृतसर-कोरबा छत्तीसगड एक्स्प्रेस रात्री ३.३५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक सहावर आली. या गाडीने पती-पत्नी आणि दोन मुली अंबाला ते नागपूर असा प्रवास करीत होते. यातील आई आणि तिच्या दोन मुलींची प्रकृती बिघडली. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आई आणि मुलींची तपासणी केली असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेच उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान संबंधित कोचचे सॅनिटायझेशन केल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.