अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 21:55 IST2022-07-13T21:54:25+5:302022-07-13T21:55:00+5:30
Nagpur News बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहार वाटपाच्या बदल्यात लाच मागणाऱ्या तीन अंगणवाडी सेविकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात
नागपूर : बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहार वाटपाच्या बदल्यात लाच मागणाऱ्या तीन अंगणवाडी सेविकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सीमा राजेश राऊत (४७), मंगला प्रकाश प्रधान (४६) आणि उज्ज्वला भालचंद्र वासनिक (५१) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार या ६० वर्षीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. चार अंगणवाड्यांमध्ये ताज्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळाले आहे. त्या अंगणवाड्यांमध्ये आरोपी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका दर महिन्याला पोषण आहार पुरवठ्याची माहिती पुस्तकात नोंदवतात. त्याआधारे पैसे बचत गटाला दिले जातात. पुस्तकात माहिती टाकण्याच्या बदल्यात आरोपी महिला तक्रारदाराकडे पैशांची मागणी करत होत्या.
साप्ताहिक सुट्टीसाठी मागितले १०० रुपये...
दर महिन्याला पोषण आहार वाटपासाठी ५०० रुपये आणि साप्ताहिक सुट्टीसाठी १०० रुपये आणि चार अंगणवाड्यांसाठी दोन हजार चारशे रुपये मागण्यात आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर अंगणवाडी सेविकांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. अंगणवाडी सेविकांनी तक्रारदाराला आवळे चौकात बोलावून घेतले. तेथे २४०० रुपये घेताना एसीबीने सीमा राऊतला अटक केली. त्यानंतर अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. राऊत आणि प्रधान यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात.