घरात शिरून महिलेच्या पतीचा जीव घेण्याची धमकी, पैसे घेऊन काढला पळ
By योगेश पांडे | Updated: December 22, 2023 17:45 IST2023-12-22T17:45:27+5:302023-12-22T17:45:47+5:30
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

घरात शिरून महिलेच्या पतीचा जीव घेण्याची धमकी, पैसे घेऊन काढला पळ
नागपूर : सहा आरोपींनी घरात शिरून एका महिलेच्या पतीचा जीव देण्याची धमकी दिली व त्यानंतर पैसे हिसकावून पळ काढला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
प्रिती अमित निखारे (३१, कुंदनलाल गुप्तानगर) या त्यांच्या पती, आई, मुलगा व मुलीसोबत राहतात. त्यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याने त्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होत्या व त्यांचे पती पत्रिका वाटण्यासाठी घराबाहेर गेले होते. बुधवारी सायंकाळी त्या एकट्याच घरी असताना अजय सूरज चव्हाण (२५, स्वीपर कॉलनी, यादवनगर), बिनाकी मंगळवारी येथील अरविंद संजय बक्सरे (२४), विजय पडोळे, रजत टेटे, प्रदीप उर्फ बंटी कनपटे (२५) व आणखी एक इसम असे घरात शिरले. त्यांच्या हातात तलवार, चाकू, काठी होते. रजत टेटे हा प्रिती यांच्या दीराचा साळा आहे. तुझा नवरा कुठे आहे, आज त्याला ठारच मारतो असे म्हणत त्यांनी महिलेला भिती दाखवली. त्यानंतर त्यांनी प्रिती यांच्या हातातील अडीच हजार रुपये हिसकावले. प्रिती यांनी आरडाओरड केल्याने आरोपी फरार झाले. प्रिती यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अजय चव्हाण व अरविंद बक्सरे यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.