विनयभंगाची वाच्यता केल्यास दिली आत्महत्या करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2023 21:32 IST2023-04-17T21:32:21+5:302023-04-17T21:32:52+5:30
Nagpur News एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने संबंधित प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विनयभंगाची वाच्यता केल्यास दिली आत्महत्या करण्याची धमकी
नागपूर : एका महिलेचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने संबंधित प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पवन शिवा निशाद (२१) असे आरोपीचे नाव आहे. त्याची वस्तीतीलच एका महिलेवर वाईट नजर होती. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता महिला एकटीच घरी असल्याने मोबाईल बघत होती. त्यावेळी पवन तिच्या घरात शिरला व तिच्यासोबत जबरदस्तीचा प्रयत्न करत विनयभंग केला. यावर महिला संतापली व तिने त्याला चांगलेच हटकले. यावरून पवन घाबरला. तिने आरडाओरड केल्यास वस्तीतील लोक चांगलेच चोप देतील या विचाराने तो घाबरला. जर कुणाला या प्रकाराची माहिती दिली तर मी आत्महत्या करेन व सुसाईड नोटमध्ये तुझे नाव लिहेन अशी त्याने धमकी दिली. महिलेने यानंतर ईमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पवनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.