‘बीएसई’ व ‘एनएसई’ची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी; नागपुरात आला धमकीचा फोन
By योगेश पांडे | Updated: April 16, 2024 23:09 IST2024-04-16T23:09:33+5:302024-04-16T23:09:56+5:30
सिताबर्डीत एनएसईचे इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर असून तेथील एका कर्मचाऱ्याला फोन आला.

‘बीएसई’ व ‘एनएसई’ची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी; नागपुरात आला धमकीचा फोन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका कंपनीचे शेअर्स विकत घेतले नाही तर मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजची इमारत बॉम्बस्फोटाने उडविण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. यासंदर्भात एका एनएसईच्या नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन आला. त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. या धमकीमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली व पोलिसांकडून तातडीने तपासाला सुरुवात झाली.
सिताबर्डीत एनएसईचे इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर असून तेथील एका कर्मचाऱ्याला फोन आला. त्याने मुंबईतून बोलत असल्याचे सांगितले. एका अमेरिकन कंपनीचे शेअर्स लगेच विकत घ्या अन्यथा बीएसई व एनएसईच्या इमारतीत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली. कर्मचाऱ्याने कार्यालयात माहिती देत लगेच सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक आसाराम चोरमाले यांनी लगेच गुन्हा दाखल केला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच मुंबई पोलीस आणि नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कार्यालयाला माहिती दिली. हा फोन नेमका कुठून आला याचा शोध सुरू आहे.