चार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:31 AM2019-09-20T11:31:17+5:302019-09-20T11:33:06+5:30

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले.

Thousands of potholes in Nagpur in four months | चार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे

चार महिन्यात नागपुरात पावणेपाच हजार खड्डे

Next
ठळक मुद्देमनपाचा दावा, रोज होते खड्डे दुरुस्ती३४ वर्षे जुन्या वाहनांच्या भरवशावर सुरू आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात अनेक रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले असले तरी पावसाळ्यात डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. यामुळे वाहनचालक अक्षरश: बेजार झाले आहेत. मात्र वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला बहुतेक हे खड्डे दिसतच नाहीत. म्हणूनच की काय शहरात रोज खड्डे पडतात व रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, असे उत्तर माहितीच्या अधिकारांतर्गत मनपातर्फे देण्यात आले आहे. जर रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, तर शहरात सद्यस्थितीत असलेले हजारो खड्डे काय एका रात्रीत निर्माण झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. शहरातील खड्ड्यांची संख्या, बुजविण्यात आलेले खड्डे, खड्डे बुजविण्यासाठी प्राप्त व खर्च झालेली रक्कम इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १० एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत शहरात ३४ हजार ७८६ खड्डे बुजविण्यात आले.
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत ११ हजार ५१ तर १ एप्रिल २०१९ ते ३१ जुल २०१९ या चार महिन्यांत ४ हजार ८७४ खड्डे बुजविण्यात आले. दरवर्षी पावसाळ्याअगोदर झोननिहाय खड्ड्यांचे निरीक्षण करण्यात येते व वेळोवेळी खड्ड्यांची दुरुस्ती होते.
शहरात रोज खड्डे पडतात व रोज दुरुस्ती होते. मेट्रो रेल्वे, सिमेंट रस्ते, उड्डाणपूल यांच्या खोदकामामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे काम करण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याचेदेखील मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘आऊटडेटेड’ वाहनांद्वारे सुरू आहे काम
रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरु शकतात. खड्डे बुजविण्यासाठी हॉटमिक्स प्लँटच्या यंत्रणेला अत्याधुनिक उपकरणे व वाहने उपलब्ध करुन दिली पाहिजेत. यंत्रणेकडे डांबरीकरणाच्या कामात लागणारी एकूण २० वाहने व मशीन्स आहेत. यातील १५ वाहने व मशीन्स ‘आऊटडेटेड’ झाली आहेत. नऊ टिप्परचे निर्धारित वयोमान १० वर्षे होते. यातील तीन टिप्पर तर १९८३ सालचे असून ३४ वर्षे झाली तरी वाहनांचा उपयोग सुरू आहे. दोन टिप्पर २७ वर्षे तर चार टिप्पर १९ वर्षांपासून कार्यरत आहेत. एक ‘स्टॅटिक रोलर’ हे १९६८ पासून वापरले जात आहे. त्याचे निर्धारित वयोमान १० वर्षे होते. मात्र ४९ वर्षे झाली तरी त्याचा वापर सुरूच आहे.

Web Title: Thousands of potholes in Nagpur in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.