तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:05 AM2019-03-04T10:05:57+5:302019-03-04T10:06:27+5:30

तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत.

Thousands of birds arrived in Nagpur from Turkistan | तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना

तुर्कस्तानातून नागपुरात आल्या हजारो पळसमैना

Next
ठळक मुद्देकाही थव्यांचा झाला परतीचा प्रवास सुरू

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुर्कस्तान, उजबेकीस्तान, पूर्वेकडच्या युरोप येथून हजारो किलोमीटरचे अंतर कापून देशभरात हजारो पाहुणे आले आहेत. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पाहुण्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहे. ‘रोझी पॅस्टर’ असे या पाहुण्या पक्ष्याचे इंग्रजीतील नाव. मराठीत भोरडी, गुलाबी मैनाही म्हणतात. मैनेसारखा दिसणारा हा गुलाबी पक्षी आहे.
युरोपमधील स्थलांतरित पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. परंतु पळस मैना हा पक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतरित करतो. सध्या नागपूरमध्ये आलेले हे पक्षी परतीच्या प्रवासावर आहेत. नागपुरात आठ ते दहा दिवस मुक्काम करून ते निघून जातात. परत दुसरे थवे त्यांची जागा घेतात.
या पक्ष्यांना प्रवासाच्या दरम्यान खाद्य पाहिजे असते. लांब पल्ल्याचा प्रवास असल्याने वजन वाढवून आरामही पाहिजे असतो. यासाठी काही दिवस ते थांबा घेतात. याला पक्षी निरीक्षक ‘फिडिंग अ‍ॅण्ड रेस्टिंग स्टॉप’ असे म्हणतात. या पक्ष्याचे डोके, गळा आणि छाती तसेच पंख व शेपटी काळ्या रंगाची, पाठ व पोट गुलाबी रंगाचे असते. डोके आणि मानेवर शेंडे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी सांगितले, पूर्वेकडील भागात थंडी असल्याने हे पक्षी भारतात येतात. नागपूरमध्ये हे पक्षी मेडिकल परिसरसह अनेक ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाला आहेत. दिवसा हे पक्षी शहरालगत जंगलात राहतात. पळस, वड, पिंपळ, काटेसावरी, सालमली व पांगाऱ्याच्या झाडांची फळे व फुलांमधील मध हे आवडते खाद्य आहे. त्यांच्या येण्याची व पळस फुले बहरण्याची वेळ एकच असल्याने या पक्ष्याला ‘पळस मैना’ही म्हणतात.

सर्वात आधी येणारा स्थलांतरित पक्षी
इतर स्थलांतरित पक्ष्यांच्या तुलनेत हा पक्षी सर्वात आधी, म्हणजे आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये येऊन नंतर दक्षिण भारत व पुढे श्रीलंकेपर्यंत जातो. परतीच्या प्रवासात ते परत दिसतात. मात्र त्यावेळी ते मोठ्या झुंडीत येतात.

पक्ष्यांची जागा ठरलेली असते
भोरड्या या पक्ष्यांची जागा वर्षानुवर्षे ठरलेली असते. त्यांची टीम ठरलेली असते. एका टीममध्ये १०० ते ५०० संख्येत हे पक्षी असतात. त्यांचा परतीचा मार्गही ठरलेला असतो. याला इंग्रजीत ‘फ्लायवेज’ म्हणतात. या ‘हायवे’ला पकडून एक-एक टीम जायला लागते. साधारण एप्रिलपासून या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो, असेही डॉ. पिंपळापुरे म्हणाले.

Web Title: Thousands of birds arrived in Nagpur from Turkistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.