स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही
By Admin | Updated: March 15, 2015 02:28 IST2015-03-15T02:28:00+5:302015-03-15T02:28:00+5:30
विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत.

स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नाही
नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून विदर्भाचा विकास आता अशक्य असून आता विदर्भाचे स्वतंत्र राज्य हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे शनिवारी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सीताबर्डी स्थित हिंदी मोरभवन येथील मधुरम सभागृहात आयोजित ‘केळकर समितीचा अहवाल आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केळकर समितीच्या अहवालाचे संक्षिप्तपणे विश्लेषण करतांना सांगितले, केळकर समिती नेमल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, आता आपण अनुशेषाची भाषा बदलून विकासाची भाषा बोलली पाहिजे. केळकर समितीने तेच सूत्र स्वीकारून विकासातील तूट, सरासरी पासून अंतर, तफावत इत्यादी शब्द वापरून विकासाची रचना मांडली आहे. मुंबई-ठाणे, पुणे-नाशिक येथेच औद्योगिक केंद्रीकरण झाले. ते कमी करण्याचे उपाय समितीने सुचविले नाही. वैदर्भीय जनतेमध्ये शासकीय धोरणांविषयी प्रचंड संताप आहे. शासनाने विश्वासघात केल्याची लोकांमध्ये भावना आहे.सोबतच समितीने तडजोड करण्याची प्रवृतीत, महाराष्ट्राप्रति बांधिलकी, महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी पुन्हा समर्पित होण्याची वृत्ती, महाराष्ट्राच्या पुनर्विचाराची आवश्यकता, अशा आशयाच्या शिफारशींचे समर्थन केले आहे. त्यामुळे केळकर समिती केवळ एक सापळा आहे. असे स्पष्ट करीत विदर्भातील जनतेने या सापळ्यापासून सावध होऊन केळकर समितीचा अहवाल नाकारावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची ठामपणे मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. राम नेवले यांनी प्रास्ताविक केले. दिलीप नरवडिया यांनी संचालन केले. माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, सरोज काशीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)