लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता देताना संख्याबळ वा कुठल्या नियमाची आडकाठी येत असेल तर असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्रिपददेखील रद्द करायला हवे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली. दिल्लीमध्ये विधानसभेत ७० पैकी ३ जागा मिळविणाऱ्या भाजपाला तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षनेतेपद देऊ केले होते. भाजपने ते स्वीकारलेही होते. जसे केजरीवालांनी दाखविले, तसे औदार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, का असा सवाल उपस्थित केला.
शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही दोघांनाही विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची विनंती केली आहे. त्यांनी लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
ते देशाचे मंत्री नाहीत, भाजपाचे आहेत
दुर्दैवाने आज आपल्या देशात जे पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमत्री आहेत, ते देशाचे नाहीत ते भाजपचे मंत्री आहेत. कारण, त्यांना देशापेक्षा स्वतःच्या पक्षाबद्दल अधिक आस्था व प्रेम आहे. ते देशाचे रक्षण करण्याऐवजी भाजपात येणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे रक्षण करताहेत, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र अखंड राहणार की तुकडे करणार?
वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. तरीदेखील वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघत असेल तर आता महाराष्ट्र अखंड राहणार की तुकडे होणार हे सरकारने स्पष्ट करावे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.