"...तर भाजपची व्यावसायिक संघटना होण्याची भिती"; आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्लीत भूमिका मांडणार
By योगेश पांडे | Updated: October 25, 2024 14:10 IST2024-10-25T14:09:21+5:302024-10-25T14:10:26+5:30
"...जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल."

"...तर भाजपची व्यावसायिक संघटना होण्याची भिती"; आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्याने मुनगंटीवार नाराज, दिल्लीत भूमिका मांडणार
नागपूर : भाजपमध्ये काही जागांवर आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर तर अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उघड नाराजी व्यक्त केली आहे. आयात उमेदवारांना प्राधान्य देत असल्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नाराज असून दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांची भावना मांडण्यासाठी ते रवाना झाले आहेत.
चंद्रपूर विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट झालेले नाही. किशोर जोरगेवार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून आहेत. तर मुनगंटीवार यांचे समर्थक ब्रिजभूषण पाझारे यांनीदेखील या जागेवर दावेदारी केली आहे. या जागेचा तिढा कायम असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. जोरगेवार यांचा पक्षप्रवेश झाला तर मुनगंटीवार यांचा त्याला विरोध राहणार आहे. जोरगेवार यांना विरोध करण्यासाठी मुनगंटीवार यांनी उघड पुढाकार घेतला आहे. दिल्लीला जाताना त्यांनी त्यांची भूमिका मांडली. पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका हे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिल्लीला जात आहे. चंद्रपूर विधानसभेत ज्याने पाच वर्ष काम केले त्याला तिकीट दिले पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. अन्यथा भविष्यात कुणीही पक्षासाठी काम करणार नाही. आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिले तर कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण होईल. पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो नेत्यांचा अधिकार आहे. मात्र त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांची नाराजी पोहोचविली गेली पाहिजे. जर असे प्रकार होत राहिले व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलले गेले तर पक्षाची सेवाभावी संघटना ही ओळख दूर होऊन व्यावसायिक संघटना अशीच प्रतिमा निर्माण होईल.
सातशे कार्यकर्त्यांनी माझी भेट घेऊन त्यांची नाराजी मांडली. त्यांच्या आग्रहामुळेच मी दिल्लीत जात आहे. वारंवार निष्ठा व पक्ष बदलविणाऱ्यांना तिकीट दिली तर इतर कार्यकर्तेदेखील निष्ठा बदलवतील. चंद्रपुरात ब्रिजभुषण पाझारे हे १९९० पासून पक्षाचे काम करत आहेत. जर अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष राहिला नाही, तर चुकीचा संदेश जाईल. अशा स्थितीत पक्ष व कार्यकर्त्यांना संघटित ठेवणे कठीण जाईल. उमेदवार आयात करणे गुन्हा नाही. जेथे पक्ष कमकुवत आहे तेथे अशी पावले उचलली पाहिजे. पक्ष मजबूत असलेल्या मतदारसंघात असे करणे योग्य नाही. तेथील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.