जुन्या वादातून तरुणाची मित्रासमोरच सब्बलचे प्रहार करत हत्या
By योगेश पांडे | Updated: January 29, 2024 18:05 IST2024-01-29T18:05:17+5:302024-01-29T18:05:31+5:30
शुभमने राहुलला शांत होण्यासाठी विनंती केली. मात्र राहुलने प्रहार करणे सुरूच ठेवले.

जुन्या वादातून तरुणाची मित्रासमोरच सब्बलचे प्रहार करत हत्या
नागपूर : मित्राशी बोलत बसलेल्या एका तरुणाची जुन्या वादातून सब्बलने प्रहार करत हत्या करण्यात आली. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमित प्रदीप आगरकर (२५, शिवनगरी, सुराबर्डी) असे मृतकाचे नाव आहे. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अमित हा त्याचा लहानपणीचा मित्र शुभम उर्फ दीपक श्रीवास (२५, डोबीनगर, वडधामना) याला भेटला. दोघेही स्वत:च्या मोटारसायकलने शिवनगरी मैदानात पोहोचले व तेथे बोलत बसला होता. त्यावेळी तेथे आरोपी राहुल पुनितराम जंघेल (२३, सुराबर्डी) हा पोहोचला. अमित आणि राहुल यांचा जुना वाद होता. त्यावरून अगोदर त्यांचे भांडणदेखील झाले होते व अमितने राहुलला शिवीगाळदेखील केली होती. राहुलने अमितला सिगारेट मागितली. यावरून अमितने राहुलकडे वळून बघितले. हे पाहून राहुल संतापला व ‘तुझे हे नेहमीचेच झाले आहे, आज तुझा किस्साच संपवतो असे म्हणत त्याने हातातील सब्बलने अमितवर प्रहार केले. सब्बलचा प्रहार अमितच्या डोक्यावरच बसला व तो रक्तबंबाळ झाला. शुभमने राहुलला शांत होण्यासाठी विनंती केली. मात्र राहुलने प्रहार करणे सुरूच ठेवले.
शुभमने सब्बल पकडण्याचा प्रयत्न केला असता राहुलने त्याच्यावरदेखील प्रहार केला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. तशा स्थितीतही शुभमने पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुलने त्याच्या हातातील फोन हिसकावला. त्यानंतर राहुलने परत अमितवर प्रहार केले. त्यात अमितचा मृत्यू झाला. घाबरलेल्या शुभमने कसाबसा तेथून पळ काढला व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शुभमच्या तक्रारीवरून राहुलविरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली.