चोरी करताना महिला जागी झाली, डोक्यावर प्रेस मारून आरोपीचे पलायन
By दयानंद पाईकराव | Updated: February 17, 2024 16:42 IST2024-02-17T16:42:06+5:302024-02-17T16:42:45+5:30
अरविंद आशिष कुमरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चोरी करताना महिला जागी झाली, डोक्यावर प्रेस मारून आरोपीचे पलायन
नागपूर : चोरी करताना महिलेला जाग आल्यामुळे तिने आरडाओरड केली असता आरोपीने तिच्या डोक्यावर प्रेस मारून जखमी करीत मुद्देमालासह पळ काढला. ही घटना शनिवारी रात्री १.३० ते २ वाजताच्या दरम्यान नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला गजाआड केले आहे.
अरविंद आशिष कुमरे (२५, रा. खुर्सापार, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंगला नं. १०, कंटोनमेंट एरीया कामठी येथे राहणाऱ्या अमरेंदर अजीत बेदी (६६) या आपल्या घरी झोपल्या होत्या. आरोपी अरविंदने त्यांच्या घरात मागील दारातून प्रवेश केला. अमरेंदर यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरड केली असता आरोपीने इलेक्ट्रीक प्रेस त्यांच्या डोक्यावर मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या घरातील २० ते २५ हजार रुपये रोख, गळ्यातील सोन्याची व चांदीची चैन, मोबाईल घेऊन पळ काढला. जखमी महिलेला उपचारासाठी कामठीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्ह्याची तातडीने दखल घेऊन आरोपी अरविंदला अटक केली. पुढील तपास नविन कामठी पोलिस करीत आहेत.