थरार क्षणभराचा! वैमानिकाच्या सतर्कतेने ‘टेक ऑफ’ टळले अन् विमानातील १७१ प्रवाशांचा वाचला जीव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 22:09 IST2022-03-22T22:09:13+5:302022-03-22T22:09:48+5:30
Nagpur News उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानात उद्भवलेल्या बिघाडामुळे मंगळवारी सकाळी गो फर्स्टचे विमान टेकऑफ घेता घेता थांबले आणि तब्बल १७१ प्रवाशांचा जीव वाचला.

थरार क्षणभराचा! वैमानिकाच्या सतर्कतेने ‘टेक ऑफ’ टळले अन् विमानातील १७१ प्रवाशांचा वाचला जीव!
नागपूर : मंगळवार, सकाळी १०.३० वाजताची वेळ... उड्डाणासाठी नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी तयार असलेल्या ‘गो फर्स्ट’ विमानाच्या इंजिनात अचानक तांत्रिक बिघाड होतो... वैमानिकाच्या सतर्कतेने ‘टेक ऑफ’ टळते आणि १७१ प्रवाशांच्या जीवाचा संभाव्य धोकाही टळतो.. हे ‘टेक ऑफ’ खरेच झाले असते तर... याचा विचारही करू नये असा, हा थरारक अनुभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवाशांनी अनुभवला.
गो फर्स्टच्या विमानात वैमानिक, क्रू सदस्यांसह एकूण १७१ जण होते. सकाळी १०.३० वाजता पुण्याकडे उड्डाण भरण्याची तयारी असतानाच जी८ ३१४ या विमानाच्या इंजिनातून मोठा आवाज येऊ लागला. विमान उड्डाण भरू शकत नाही म्हणून परत पार्किंग परिसरात आणण्यात आले आणि प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. इंजिनमधून मोठा आवाज आणि कॉकपिटमध्ये बिघाड झाल्याचे संकेत वैमानिकाला मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले.
धोका न पत्करता वैमानिकाने विमान पार्किंगकडे वळविले. यादरम्यान प्रवासी २० मिनिटे विमानात बसून होते. त्यानंतर त्यांना उतरवून एअरपोर्ट टर्मिनल इमारतीच्या प्रवासी परिसरात आणण्यात आले. या ठिकाणी प्रवाशांना चहा, नाष्टा आणि जेवण देण्यात आले. काही प्रवाशांच्या आग्रहास्तव कंपनीने काही प्रवाशांना अन्य विमानाने मुंबईला पाठविले. उर्वरित प्रवाशांना नेण्यासाठी दुसरे विमान नागपुरात आले. सायंकाळी ६.०५ वाजता विमान पुण्याकडे रवाना झाले आणि पुणे येथे ७.३५ वाजता पोहोचले.
...तरी दुरुस्त झाले नाही विमान
विमान धावपट्टीवरून परत आणल्यानंतर ‘आयसोलेशन बे’मध्ये ठेवण्यात आले. हे विमान एअरबस ३२० प्रकारातील आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत विमान दुरुस्त झाले नव्हते. यामध्ये जास्त बिघाड असल्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.