विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

By निशांत वानखेडे | Updated: July 28, 2025 19:27 IST2025-07-28T19:25:41+5:302025-07-28T19:27:28+5:30

ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे निधन : साहित्य जगतात शाेक

The thread that bound women writers of Vidarbha together has broken; Chief Minister expresses grief | विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

The thread that bound women writers of Vidarbha together has broken; Chief Minister expresses grief

नागपूर : ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे साेमवारी निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या हाेत्या. त्यांच्या निधनाने नागपूरसहविदर्भाच्या साहित्य जगतात शाेक पसरला आहे. विदर्भातील नव लेखिकांना व्यासपीठ देणाऱ्या व एकूणच लेखिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटल्याची भावना व्यक्त हाेत आहे.

शुभांगी भडभडे यांचा जन्म २१ डिसेंबर १९४२ राेजी नागपूरच्या महाल भागात झाला. आपल्या हयातीत त्यांनी विपुल लेखन केले आहे. मुख्यत्वे त्यांनी चरित्रलेखनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी २२ हून अधिक चरित्रात्मक कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. हेडगेवारजी, प. पू. गोळवलकर गुरुजी यांचा समावेश आहे. अलीकडेच त्यांची पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या जीवनावरील ‘राजयोग : स्वयंसेवक ते प्रधानसेवक एक दैदीप्यमान यात्रा’ ही कादंबरी प्रकाशित झाली असून ती त्यांनी माेदी यांना भेट दिली हाेती. त्यांनी लिहिलेली ‘चाणक्य’ ही चरित्रात्मक कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. याशिवाय २२ हून जास्त सामाजिक कादंबऱ्या, १० कथासंग्रह, तितकीच दोन अंकी नाटके, १३ हून अधिक एकांकिका, प्रवासवर्णने, ललित लेखसंग्रह, बालसाहित्याची १० पेक्षा जास्त पुस्तके व काही अप्रकाशित कविता असे विपुल लेखन केले आहे. वयाची ८० वर्षं पूर्ण झाल्यानंतरही नित्य लेखन करणाऱ्या शुभांगीताई खऱ्या अर्थाने साहित्यसाधक होत्या, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

शुभांगी भडभडे या साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्य संमेलने, नाट्य संमेलने व साहित्यिक परिषद व चर्चासत्रासारखे उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. अनेक नव्या लेखिकाना लिहिते केले. ‘बकुळीची फूलं’ ही कादंबरी त्यांनी त्यांच्या जीवनावर लिहिली आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या शुभांगी भडभडे यांना नुकतेच महाकवी कालिदास जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाेते.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ९.३० वाजता त्यांच्या लाेकमान्यनगर येथील निवासस्थानाहून निघून अंबाझरी घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंड व बराच माेठा आप्तपरिवार आहे.

"सुप्रसिद्ध लेखिका, ज्येष्ठ कादंबरीकार आणि पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यसाधक शुभांगीताई भडभडे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावरही त्यांनी चरित्रलेखन केले होते. त्यांच्या निधनाने एक प्रतिभावंत साहित्यिक आपण गमावला आहे. 'मृत्युंजयाचा महायज्ञ' ही कादंबरी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिली, तेव्हा त्याला 'ऑडियो बुक'मध्ये रूपांतरित करण्याची विनंती मी त्यांना केली होती आणि त्यांनी त्याला सहर्ष होकार दिला आणि ते काम पूर्ण झाले. अनेक पुस्तकांना त्यांनी हक्काने माझ्याकडून प्रस्तावना घेतल्या. त्यामुळे सातत्याने त्यांच्याशी संवाद व्हायचा. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

"ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्या निधनाची बातमी समजली. शुभांगीताईंनी साहित्य क्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. ऐंशीहून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी साहित्याचा एक अमूल्य ठेवा आपल्या वाचकांसाठी मागे ठेवला आहे. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लेखिका नाट्य महोत्सवासारख्या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी सातत्याने आयोजन केले. अनेक साहित्य संमेलनांचे आयोजन केले. केवळ नागपूर नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील लेखिकांना एका धाग्यात बांधून नवलेखिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शुभांगीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखातून सावरण्याचे बळ भडभडे कुटुंबियांना मिळो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. ॐ शांती"
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री, भारत सरकार

Web Title: The thread that bound women writers of Vidarbha together has broken; Chief Minister expresses grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.