तिसरी लाट ओसरली; २४ तासात १८१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 21:47 IST2022-02-15T21:45:49+5:302022-02-15T21:47:42+5:30
Nagpur News कोरोनाचा प्रकोप कमी होत असून, नागपूर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली आहे. २४ तासात जिल्ह्यामध्ये १८१ नवे रुग्ण आढळले.

तिसरी लाट ओसरली; २४ तासात १८१ नवे रुग्ण
नागपूर : कोरोनाचा प्रकोप कमी होत असून, जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या तीन हजाराच्या खाली आली आहे. २४ तासात जिल्ह्यामध्ये १८१ नवे रुग्ण आढळले. चाचण्या वाढल्या असतानादेखील सोमवारच्या तुलनेत रुग्णांमध्ये घट झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची पॉझिटिव्हिटी टक्केवारी २.६८ टक्क्यांवर घसरली आहे.
मंगळवारच्या अहवालानुसार, २४ तासात शहरामध्ये ५ हजार ४६८ चाचण्या झाल्या व ११० नवे बाधित आढळले. शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर ग्रामीणमध्ये १ हजार २८८ चाचण्या झाल्या व त्यातील ५५ जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५ लाख ७६ हजार ३७२ वर पोहोचली आहे. त्यात शहरातील ३ लाख ९८ हजार ९०७ तर, ग्रामीणमधील १ लाख ६७ हजार ६१८ रुग्णांचा समावेश आहे. तर मृत्यूंची संख्या १० हजार ३२५ इतकी झाली आहे. मंगळवारी ८५३ कोरोनाबाधित बरे झाले. बरे झालेल्यांची संख्या ५ लाख ६३ हजार १५७ वर पोहोचली आहे.
८० टक्के रुग्ण गृह विलगीकरणात
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा २ हजार ८९० इतका होता. यात शहरातील १ हजार ६६८ तर, ग्रामीणमधील १ हजार ३८८ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांपैकी २ हजार ३०७ रुग्ण (७९.८३ टक्के) गृह विलगीकरणात असून, उर्वरित रुग्ण विविध रुग्णालये व संस्थात्मक विलगीकरणात आहेत.