आयफोन घेऊन न दिल्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 20:01 IST2022-10-01T20:01:03+5:302022-10-01T20:01:24+5:30
Nagpur News आई-वडिलांनी आयफोन घेऊन न दिल्यामुळे रागाच्या भरात १८ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

आयफोन घेऊन न दिल्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास
नागपूर : आई-वडिलांनी आयफोन घेऊन न दिल्यामुळे रागाच्या भरात १८ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ४.३० ते ४.४५ वाजताच्या सुमारास घडली.
चैतन्या सुनील राघोर्ते (वय १८, नवनाथनगर, खरबी) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बीबीएला शिकत होती. चैतन्याचे वडील गृहउद्योग करतात. चार-पाच दिवसांपासून तिने आपल्या आई-वडिलांना आयफोन घेऊन देण्यासाठी तगादा लावला; परंतु कुटुंबीयांनी पैसे कमी आहेत, आयफोन नंतर घेऊ असे सांगून तिची समजूत घातली. मात्र, कुटुंबीयांनी आयफोन घेऊन न दिल्यामुळे चैतन्याने मनात राग धरला.
शुक्रवारी आई-वडील इतवारीला गेले होते. घरी आजी, आजोबा आणि तिची लहान बहीण होती. चैतन्याने पहिल्या माळ्यावरील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी सुनील बाबूराव राघोर्ते (५०) यांनी दिलेल्या सूचनेवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चैतन्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
..........