नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

By सुमेध वाघमार | Updated: May 22, 2025 17:56 IST2025-05-22T17:55:21+5:302025-05-22T17:56:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले.

The risk of sickle cell-thalassemia has increased in Nagpur. | नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

नागपुरात सिकलसेल-थॅलेसेमियाचा धोका वाढला

सुमेध वाघमारे, नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सिकलसेल निर्मूलन अभियान सुरू असतानाच, नागपूर येथून चिंता वाढवणारे आकडे समोर आले. मेयो आणि मेडिकलने मिळून १ लाख ३४ हजार ४०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली असता, त्यात ३.५८ टक्के, म्हणजेच ४ हजार ८१७ लोक सिकलसेलचे वाहक (कॅरियर) तर २६७ लोक सिकलसेलचे पीडित (ग्रस्त) असल्याचे निदान झाले आहे. याशिवाय, थॅलेसेमियाचे २१६ रुग्णही आढळून आले आहेत. या दोन्ही आजाराचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतात एकूण १.८० कोटी सिकलसेल वाहक आणि १४ लाख सिकलसेल पीडित होते. महाराष्ट्रात १६ हजार ६७४ पीडित आणि २ लाख ९ हजार ६८४ वाहक होते. मागील १३ वर्षांत या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. आई-वडिलांकडून मुलांना नकळत दिला जाणारा हा आनुवंशिक आजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सूचनेनुसार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर महानगरपालिका आणि इतर संबंधित विभागांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) यांनी शहर व ग्रामीण भागात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेतून सिकलसेल रुग्णांची वाढती संख्या समोर आली आहे. 

मेयोच्या तपासणीत १,८३७ सिकलसेल वाहक
मेयो रुग्णालयाने सिकलसेल आणि थॅलेसेमिया तपासणीची मोहीम हाती घेतली होती. वर्षभरात शहर व ग्रामीण भागातील ५८९ ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ४३ हजार ५०० लोकांची तपासणी करण्यात आली. यात १९ हजार १२३ महिला आणि २४ हजार ३७७ पुरुषांचा समावेश होता. या तपासणीत १ हजार ८३७ लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर ५८ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. तसेच, १८३ लोकांना थॅलेसेमिया असल्याचे आढळून आले.

मेडिकलच्या तपासणीत २,९८० सिकलसेल वाहक
मेडिकल रुग्णालयाने एका वर्षाच्या कालावधीत १५०० पेक्षा जास्त ठिकाणी ५ ते ५५ वर्षे वयोगटातील ९० हजार ९०८ लोकांची सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी केली. यात ३८ हजार ५०१ पुरुष आणि ५२ हजार ४०७ महिलांचा समावेश होता. या तपासणीत २ हजार ९८० लोक सिकलसेलचे वाहक (एएस) असल्याचे, तर २०९ लोक सिकलसेलने पीडित (एसएस) असल्याचे निदान झाले. थॅलेसेमियाचे ३३ रुग्णही आढळून आले. तपासणी प्रक्रियेनंतर सर्व सहभागी व्यक्तींना सिकलसेल स्टेटस आयडी कार्ड वितरित करण्यात आले. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी आवश्यक 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूचनेवरून सिकलसेल आणि थॅलेसेमियाची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यातून मिळालेल्या आकडेवारीवरून नागपूर जिल्ह्यात सिकलसेल आणि थॅलेसेमियाची समस्या किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. या दोन्ही आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी व्यापक तपासणी व जनजागृती मोहिम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली आहे. 
-डॉ. रवी चव्हाण, अधिष्ठाता मेयो

Web Title: The risk of sickle cell-thalassemia has increased in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.