संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
By योगेश पांडे | Updated: April 30, 2025 23:37 IST2025-04-30T23:37:13+5:302025-04-30T23:37:41+5:30
अचानक पाहणी केल्यानंतर उघड झाली बाब

संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उपराजधानीत हत्या, हल्ले यांचे प्रमाण वाढले असताना पोलिसांची नियमित गस्त व्हावी, अशी मागणी जोर धरते आहे; मात्र सायंकाळची गस्त टाळण्याचे प्रकार ठाणेदारांकडून घडत आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सायंकाळची गस्त टाळणाऱ्या पारडी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना तेथे पोहोचून फटकारले. पोलिस आयुक्तांच्या अकस्मात भेटीमुळे खळबळ उडाली होती.
मंगळवारी रात्री ८ ते १० दरम्यान पोलिस आयुक्तांनी पारडी ठाण्याला भेट दिली. आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या बाहेर जाण्यास सांगून पायदळ पेट्रोलिंग, गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी जाऊन सराईत गुन्हेगारांची तपासणी आणि प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत स्पष्ट निर्देश देऊन रवाना केले. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्वतः पारडी बाजार, हनुमान मंदिर चौक, प्रजापती नगर या गर्दीच्या भागात प्रत्यक्ष पेट्रोलिंग केले.
पोलिस आयुक्त त्यानंतर सिम्बॉयसिस कॉलेज परिसराकडे गेले. प्रजापती मेट्रो स्टेशनजवळ काही तरुण टवाळखोरी करताना दिसून आले. त्यांना आयुक्तांनी स्वतः ताब्यात घेऊन आपल्या वाहनात बसवले. त्यानंतर डॉ. सिंगल स्वतः पोलिस ताफ्यासह सिम्बॉयसिस कॉलेजच्या सुनसान परिसरात गेले. या परिसरात ड्रग्स, गांजा, धूम्रपान, मद्यपान करणारे व टवाळखोरी करणाऱ्यांविषयी तक्रारी त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अचानक पाहणी केली. अंधाऱ्या भागात काही लोक दारू पित होते. त्यांनादेखील पोलिस आयुक्तांनी ताब्यात घेतले. त्यात पीयूष देविदास क्षीरसागर (२४, प्रधानमंत्री आवास योजना), आदित्य विजय येनूरकर (२१, देवी नगर, वाठोडा), संतोष कुमार शारदा राम (देवीनगर, वाठोडा), नमन त्यागी (१९, सिम्बॉयसिस वसतिगृह), आर्यन रवी नेलवान (२१, सिम्बॉयसिस वसतिगृह), अंकित भोयर (२५, खापा, तुमसर, भंडारा) यांचा समावेश होता.