सर्वत्र मनोहारी मुद्रा उमटवणारा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा धनी हरपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 22:11 IST2022-10-17T22:04:17+5:302022-10-17T22:11:10+5:30
Nagpur News सोमवारी मनोहर म्हैसाळकर यांना विदर्भ साहित्य संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता अमेल दालनात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वत्र मनोहारी मुद्रा उमटवणारा प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा धनी हरपला
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर हे प्रत्येक कार्यात आपली मनोहारी मुद्रा उमटवणारे, हरहुन्नरी, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. कार्यकुशलता, अस्मिता, शिस्त यांचा वस्तुपाठ असलेले मनोहरराव उत्तम प्रशासक, संघटक होते. शतक महोत्सवात त्यांच्या जाण्याने विदर्भ साहित्य संघाची मोठी हानी झाली आहे, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सोमवारी मनोहर म्हैसाळकर यांना विदर्भ साहित्य संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता अमेल दालनात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते तर व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे विश्वस्त निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. पिनाक दंदे, अजित दिवाडकर, आशुतोष शेवाळकर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, कमर हयात उपस्थित होते.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना डॉ. श्रीपाद जोशी यांनी ‘मेकिंग ऑफ मनोहर’ जवळून बघितला आहे. त्यांच्या डोक्यात वि. सा. संघाशिवाय काहीच नव्हते आणि आज हा उभा असलेला डोलारा त्यांचीच देण असल्याचे सांगितले. न्या. विकास सिरपूरकर यांनी आता वि. सा. संघाबाबतचा जवळपणाच हिरावला गेल्याची भावना व्यक्त केली.
अजित दिवाडकर यांनी मनोहर म्हैसाळकरांसोबत घालविलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. पिनाक दंदे, डॉ. रवींद्र शोभणे, कमर हयात यांनीही भावना व्यक्त केल्या.
गिरीश गांधी यांनी मनोहर म्हैसाळकर यांचा कुशल संघटक, हरहुन्नरी व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असा उल्लेख केला. याप्रसंगी महेश एलकुंचवार, जावई न्या. रोहित देव, मुलगी मंजू घाटे, सुनिती देव, लोकनाथ यशवंत, सुधाकर गायधनी यांच्यासह साहित्य, नाट्य व सामाजिक क्षेत्रांतील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.
...............