केवळ हिंदू-मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्माच्या ऐक्याची गरज
By आनंद डेकाटे | Updated: April 26, 2025 17:06 IST2025-04-26T17:05:54+5:302025-04-26T17:06:16+5:30
संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण : दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन

The need for unity of all religions, not just Hindu-Muslims
आनंद डेकाटे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक उन्मादामुळे प्रत्येक देश आतून पोखरला जातोय. त्यामुळे केवळ हिंदू-मुस्लीम एकोप्याचे कार्य करून चालणार नाही. तर जगातील सर्व धर्माच्या ऐक्याच्या कार्याची या देशाला व जगाला अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी कुलगुरू, एमआयटी पुण्याचे सल्लागार आणि दहावे अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण यांनी येथे केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे मातोश्री विमलताई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल काॅलेज येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसराला मरहूम डाॅ. अक्रम पठाण साहित्य नगरी तर विचारपीठाला महात्मा ज्योतिबा फुले-डाॅ. आंबेडकर विचार मंच असे नाव देण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनुपमा उजगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हुसेन दलवाई, प्राचार्य डाॅ. प्रशांत कोठे, मुख्य आमंत्रक प्रा. जावेद पाशा कुरैशी, प्रा. कोमल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन सरदार, अब्दुल रऊफ शेख, सरदार जगजित सिंग, ॲड. आसिफ कुरैशी, प्रा. रमेश पिसे, प्रा. फ. म. शहाजिंदे, ज्ञानेश्वर रक्षक, कुलदीप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
संमेलनाध्यक्ष डाॅ. श. नू. पठाण म्हणाले, मुस्लीम समाजाला शिक्षणाचे कार्यच विकासाकडे घेऊन जाईल. त्यामुळे शिक्षणावर अधिक भर द्या. एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा समन्वयाचा जागर करा. या संमेलनाचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. सर्व विचारांना सामावून घेण्यासाठी हे संमेलन असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत या संमेलनातून हिंदू-मुस्लीम एकोप्याचा संदेश जाऊ द्या. वारकरी संत व सुफी संतांनी मांडलेल्या सांप्रदायिक सद्भावाची आज २१ व्या शतकात फार गरज आहे. या संमेलनातून हा सांप्रदायिक सद्भाव व समन्वयाचा संदेश गेला तर मी या संमेलनाचा मुख्य संदेश समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. डाॅ. शरयू तायवाडे या स्वागताध्यक्ष होत्या. परंतु आजारपणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या वतीने प्रा. कोमल ठाकरे यांनी स्वागताध्यक्षांचे भाषण वाचून दाखविले.
मुख्य आमंत्रक प्रा. जावेश पाशा कुरैशी यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. ते म्हणाले, हे संमेलन केवळ मुस्लिमांचे नाही, तर मुसलमान म्हणून व्यक्त होण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवण्यासाठीचं आहे. मुस्लिम हे अब्दुल कलाम यांच्यासारखे मिसाईलमॅनही आहेत, हे दाखवण्यासाठी आहे. सरदार जगजित सिंग, नितीन सरदार, अब्दुल रउफ शेख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचालन नेहा गोडघाटे यांनी केले. तर मुबारक शेख यांनी आभार मानले.
आज खरी गरज चांगला माणूस होण्याची आहे - उद्घाटक डाॅ. अनुपमा उजगरे
डाॅ. अनुपमा उजगरे संमेलनाचे उद्घाटन करताना म्हणाल्या, सध्या लोकांची भाषा अतिशय वाईट होत चालली आहे. आज चांगले साहित्यिक होण्यापेक्षा चांगले माणूस होण्याची खरी गरज आहे. हे दहावे संमेलन आहे. असेच शंभरावे संमेलनसुद्धा व्हावे, यासाठी सातत्याने साहित्यनिर्मिती होण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद चांगल्या भाषेत व्हावा. साहित्य हे माणसाला जोडते. त्यामुळे सर्व समाजामध्ये सलोखा असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध, मृतांना श्रद्धांजली
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अय्युब नल्लामंदू यांनी कुरआन आयतीचे पठण केले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कार
स्मरणिकेसह विविध पुस्तकांचे प्रकाशन
यावेळी मऱ्हाठवाणी या स्मरणकिसह प्रा. डाॅ. प्रमोद मनघाटे लिखीत राष्ट्रंत तुकडोजी महाराज, प्रा. जावेद पाशा कुरैशी लिखीत हिंदूत्व आणि धर्मांतरीत मुसलमानांपुढील आव्हाने, अबरार नल्लामंदू संपादित कासिद संमेलन विशेषांक, मुजफ्फर सय्यद लिखीत ईद मिलन विशेषांक, डाॅ. के.जी. पठाण यांचे उतार वयातील चढण काव्यसंग्रह, गौस शिकलगार यांचे शब्द सारथी आणि मुबारक शेख लिखीत अजान आणि चालीसा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
जैबुन्नीसा शेख, प्रा. रुबीना पटेल यांच्यासह अनेकांचे सत्कार
यावेळी जैबुन्नीसा शेख, प्रा. रूबीना पटेल, शकील पटेल, डाॅ. मुहीम कादरी, डाॅ. शाहीद अली जाफरी, डाॅ. जलील पटेल, डाॅ. अर्जीनबी शेख, जहीरुद्दीन शेख, मलिका शेख, रहीम शेख बंदी, जमील अंसारी, यामिनी चौधरी, डाॅ. विनोद राऊत, नासीर जुम्मन शेख, नेहा गोडघाटे, शैले जैमिनी, हाजी नासीर यांचा सत्कार करण्यात आला.