मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 08:35 IST2024-12-22T06:25:09+5:302024-12-22T08:35:01+5:30

फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, जीएडी

The much awaited portfolio allocation of the Maharashtra state cabinet was announced on Saturday night | मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

एकनाथ शिंदे : नगरविकास, एमएसआरडीसी अन् गृहनिर्माणही 

अजित पवार : वित्त-नियोजन, उत्पादन शुल्कही 

विखे पाटील, गिरीश महाजन, मुंडे यांना धक्का

चंद्रशेखर बावनकुळे - महसूल

बाबासाहेब पाटील -सहकार

माणिकराव कोकाटे- कृषी

प्रकाश आबिटकर-  सार्वजनिक आरोग्य

प्रताप सरनाईक- परिवहन

आकाश फुंडकर - कामगार

आदिती तटकरे - महिला व बालकल्याण

दाद भुसे- शालेय शिक्षण

अशोक उईके आदिवासी विकास

संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास बरोबरच गृहनिर्माण आणि सार्वजिनक बांधकाम (सार्वजिनक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी) तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खाते असेल. महत्त्वाचे मानले जाणारे महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. शिंदेसेनेचे दादा भुसे हे राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील. 

प्रताप सरनाईक यांना परिवहन, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुंडकर हे नवे कामगार मंत्री असतील. काही खात्यांची विभागणी ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्धविकास अशा काही खात्यांची विभागणी करण्यात आली. गृहखात्याचे महत्त्वाचे राज्यमंत्रिपद भाजपच्या माधुरी मिसाळ (शहरे) व पंकज भोयर (ग्रामीण) यांना मिळाले. शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांच्याकडील महत्त्वाचे उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे गेले. त्यांना पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण ही खाती मिळाली.

उईके आदिवासी विकास; शिरसाट सामाजिक न्याय 

आदिवासी विकास खाते यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार अशोक उईके यांना मिळाले. सामाजिक न्याय खाते हे छत्रपती संभाजीनगरचे शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना देण्यात आले. शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर हे नवे सार्वजनिक आरोग्य मंत्री असतील. अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील नवे सहकार मंत्री असतील. 

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी देण्यात आली. गणेश नाईक हे नवे वनमंत्री असतील. या आधी हे खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होते. आधी गिरीश महाजन यांच्याकडे असलेले ग्रामविकास हे महत्त्वाचे खाते पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे जयकुमार गोरे यांच्याकडे गेले.

काय झाले बदल?

शिंदे सरकारमध्ये भाजपकडे असलेले गृहनिर्माण खाते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

शिंदेसेनेकडे पूर्वी असलेले उत्पादन शुल्क खाते हे अजित पवार यांच्याकडे गेले. 

आधी भाजपकडे असलेले पर्यटन खाते हे शिंदेसेनेकडे (शंभूराज देसाई) गेले.

यांच्याकडे खाती कायम

वैद्यकीय शिक्षण हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याकडे तर उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहिले. अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण खाते पुन्हा मिळाले. 

गुलाबराव पाटील यांच्याकडे पूर्वीचेच पाणीपुरवठा व स्वच्छता खाते तर संजय राठोड यांच्याकडे मृदा व जलसंधारण खाते कायम राहिले. मंगलप्रभात लोढा यांच्याकडेहीँ कौशल्य विकास खाते कायम आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते पुन्हा देताना पूर्वी दीपक केसरकर यांच्याकडे असलेले मराठी भाषा खातेही त्यांना देण्यात आले.

गृहनिर्माण खाते भाजपने एकनाथ शिंदे यांना दिले. शिंदे सरकारमध्ये अतुल सावे यांच्याकडे हे खाते होते. आता सावे यांना पूर्वीचे ओबीसी कल्याण खाते देतानाच ऊर्जा (नवीनीकरणीय ऊर्जा), दुग्धविकास ही खाती देण्यात आली.

विखे पाटील, महाजन, पंकजा यांना धक्का

शिंदे सरकारमध्ये महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देताना ते विभागून देण्यात आले. त्यांची आधीची दोन्ही खाती गेली. त्यांच्याकडे गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार असेल.

गिरीश महाजन हे या आधी ग्रामविकास व पर्यटन मंत्री होते पण ही दोन्ही खाती गेली. आता त्यांना जलसंपदा (विदर्भ व तापीखोरे) आणि आपत्ती व्यवस्थापन अशी खाती देण्यात आली. शिंदे सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते धनंजय मुंडेंकडे गेले. मुंडे हे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते, आता अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे नवे कृषी मंत्री असतील. मुंडे यांना आधीपेक्षा तुलनेने कमी महत्त्वाचे खाते मिळाले.

जयकुमार रावल यांनाही पणन व राजशिष्टाचार ही तुलनेने कमी महत्त्वाची खाती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या मंत्रिमं- डळात महिला, बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली. भरत गोगावले यांना रोजगार हमी, फलोत्पादन, खारपाण पट्टा विकास या खात्यांवर समाधान मानावे लागले.
 

Web Title: The much awaited portfolio allocation of the Maharashtra state cabinet was announced on Saturday night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.