व्यवस्थापकाचा रेस्टॉरेन्टलाच गंडा, परस्पर उघडले बॅंक खाते
By योगेश पांडे | Updated: August 29, 2023 17:31 IST2023-08-29T17:30:43+5:302023-08-29T17:31:13+5:30
बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

व्यवस्थापकाचा रेस्टॉरेन्टलाच गंडा, परस्पर उघडले बॅंक खाते
नागपूर : एका रेस्टॉरेन्टमधील व्यवस्थापकाने मालकाची फसवणूक करत दोन लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. त्याने रेस्टॉरेन्टच्या नावाने परस्पर बॅंकेत खाते उघडले व ऑनलाईन डिलिव्हरीचे पैसे तो त्या खात्यात वळते करत होता. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
अर्जुन प्रदीप जयस्वाल (३१, रिमझिम निवास, उज्वल नगर, सोमलवाडा) असे आरोपीचे नाव आहे. बजाजनगर चौकाजवळ आशीष कोवळे (३९, पटेलनगर) यांनी २०२० साली द कॉमन ग्राऊंड स्पोर्ट्स कॅफे ॲंड रेस्टॉरेन्ट सुरू केले. त्यांनी अर्जुनला व्यवस्थापक म्हणून नेमले. अर्जुन हॉटेलच्या मार्केटिंग, पैशांचे व्यवहार यांची कामे पाहत होता व महिनाअखेरीस पूर्ण हिशेब सादर करत होता. २०२२ पासून त्याची वर्तणूक बदलली होती. तो कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करायचा व विनाकारण वाद घालून पैसे अडवून ठेवायचा.
कोवळे यांच्याकडे तक्रार गेल्यावर त्यांनी विचारले असता अर्जुनने त्यांच्याशीदेखील वाद घातला. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्याला नोकरीवरून काढण्यात आले. काही दिवसांअगोदर कोवळे यांना माहिती मिळाली की ऑगस्ट २०२२ मध्ये अर्जुनने रेस्टॉरेन्टचा गुमास्ता व बनावट फूड लायनन्सच्या आधारे बॅंकेत खाते उघडले होते. ऑनलाईन डिलिव्हरीतून येणारे पैसे तो थेट तेथे वळते करायचा. त्यानंतर कोवळे यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अर्जुनविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला व त्याला अजनीतील एका हॉटेलमधून अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून पावणेदोन लाख रुपये जप्त केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत, प्रवीण पांडे, प्रमोद पारखी, रितेश मलगुलवार, शेरसिंग राठोडे, नितेश तडसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.