कमी दरात सोने देण्याचे आमिष, १८ लाखांनी फसविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:05 IST2024-12-11T15:04:48+5:302024-12-11T15:05:38+5:30
कोंढाळी परिसरातील घटना : आरोपी मुलासह वडिलास अटक

The lure of giving gold at a low rate, 18 lakhs cheated
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/कोंढाळी : गुप्तधनात सापडलेले सोने कमी दरात विकण्याची बतावणी करीत फिर्यादीला मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील १८ लाख रुपये हिसकावून घेतल्याची घटना कोंढाळी (ता. काटोल) परिसरात सोमवारी (दि. ९) घडली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मंगळवारी (दि. १०) सायंकाळी आरोपी मुलासह त्याच्या वडिलास देवलापार परिसरात अटक केली.
पप्पू ऊर्फ प्रमोद कृष्णकृमार अवस्थी (वज ५७) व आशुतोष प्रमोद अवस्थी (२७) दोघेही रा. जगनाडे चौक, नंदनवन, नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी गजानन सुखदेव ब्राह्मणे (४३, रा. मुलताई चौक, वरुड, जिल्हा अमरावती) यांना कमी दराने सोने देण्याची बतावणी केली होती. दोघांच्या सूचनेवरून गजानन १८ लाख रुपये घेऊन सोमवारी दुपारी कोंढाळी परिसरात आले होते.
चर्चेत एक किलो सोने २८ लाख रुपयात खरेदी करण्यास गजानन यांनी सहमती दर्शविली. १० लाख रुपये कमी असल्याने ही रक्कम घेण्यासाठी आरोपींनी गजानन यांना त्यांच्या एमएच-४३/एआर-७३९९ क्रमांकाच्या मर्सिडिझ कारमध्ये बसविले आणि वरुडच्या दिशेने निघाले. मागे येत असलेल्या कारमध्ये सोने असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कारंजा (घाडगे) टोल नाक्याजवळ मागे येणाऱ्या कारने काटोलच्या दिशेने वळण घेतले. काटोल परिसरात त्यांच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर रोखून त्यांना बेदम मारहाण केली. त्यांना कारमधून ढकलून आरोपींनी पळ काढला.
गजानन यांनी त्यांच्या काटोल येथे राहणाऱ्या मित्राला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. दोघांनी लगेच कोंढाळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. एलसीबीच्या पथकाने या प्रकरणात दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे, किशोर शेरकी, जीवन राजगुरू व सागर गोमासे तसेच कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांच्या पथकाने केली.
इतर आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात आरोपींची संख्या दोनपेक्षा अधिक आहे. अटक करण्यात आलेले दोघेही मुख्य आरोपी असून, इतरांची नावे कळू शकली नाही. या इतरांनी मर्सिडिझ कार रोखून आपण पोलिस असल्याची बतावणी केली आणि गजानन यांना मारहाण केली होती. हे सर्व आरोपी मर्सिडिझ कारच्या मागे दुसऱ्या वाहनाने येत होते. त्यांची संख्या किमान सात ते आठ असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे स्पष्ट केले.
४२ लाखांचा मुद्देमाल जप्त
या आरोपींना पकडण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी चार वेगवेगळी पथके तयार केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी देवलापार परिसरातील नागपूर-जबलपूर महामार्गावर असल्याचे स्पष्ट होताच एलसीबीच्या पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांची एमएच-४३/एआर-७३९९ क्रमांकाची मर्सिडिझ कार व एमएच-३१/डीव्ही-९९२२ क्रमांकाचे वाहन तसेच हिसकावून घेतलेल्या १८ लाख रुपयांपैकी सात लाख रुपये असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.