मिहान सेझमधील ल्युपिनला अमेरिकेसाठी इंजेक्टेबल औषधी बनविण्यासाठी मिळाली परवानगी
By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 31, 2022 15:30 IST2022-10-31T15:10:50+5:302022-10-31T15:30:28+5:30
ल्युपिन लिमिटेडच्या नागपुरातील प्रकल्पात आतापर्यंत ओरल औषधांचे उत्पादन

मिहान सेझमधील ल्युपिनला अमेरिकेसाठी इंजेक्टेबल औषधी बनविण्यासाठी मिळाली परवानगी
नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस हे रोजगार देणारे प्रकल्प नागपुरातून गुजरातेत गेले आहेत. या प्रकल्पावरून सर्वच पक्षांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच मिहान-सेझकरिता गुड न्यूज आहे. मिहान सेझमधील औषध निर्माता ल्युपिन कंपनीला अमेरिकन बाजारासाठी इंजेक्टेबल औषधी बनविण्याची परवानगी मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कंपनीच्या मिहान-सेझमधील प्रकल्पातील दुसऱ्या युनिटला अमेरिकन औषधी विभाग यूएसएफडीएने पाच सूचनांसह फॉर्म-४८३ जारी केले आहे. अमेरिकन अन्न व औषधी प्रशासनाने (यूएसएफडीए) उत्पादन प्रकल्पाचे निरीक्षण केल्यानंतर फॉर्म-४८३ कंपनीला जारी करण्यात आल्याची माहिती आहे. देशातील
नामांकित औषधी उत्पादक कंपनी ल्युपिन लिमिटेडच्या नागपुरातील प्रकल्पात आतापर्यंत ओरल औषधांचे उत्पादन होते.
या औषधांची १०० टक्के निर्यात करण्यात येते. कंपनीने नागपुरातच इंजेक्टेबल औषधीच्या उत्पादनाकरिता अमेरिकल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार यूएसएफडीएच्या चमूने नागपूरच्या प्रकल्पातील दुसऱ्या युनिटचे निरीक्षक १७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान केले होते, हे विशेष.