प्रशासनाकडून फाटक बंद राहण्याचा फलक, प्रत्यक्षात फाटकावरून वाहतूक सुरू
By नरेश डोंगरे | Updated: August 4, 2024 00:15 IST2024-08-04T00:15:15+5:302024-08-04T00:15:38+5:30
फाटकही सुरू आहे आणि मोठी वाहतूकही सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

प्रशासनाकडून फाटक बंद राहण्याचा फलक, प्रत्यक्षात फाटकावरून वाहतूक सुरू
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २४ तास वाहनांची वर्दळ असलेले कळमना चिखली मार्गावरचे ५६७ क्रमांकाचे रेल्वे फाटक १ ऑगस्टपासून बंद राहील, असे दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या सूत्रांनी जाहिर केले. प्रत्यक्षात मात्र, हे फाटकही सुरू आहे आणि मोठी वाहतूकही सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
शहरातील अत्यंत गजबजलेल्या भागात कळमना-चिखली मार्गावर रेल्वे फाटक आहे. तेथून २४ तास वाहनांची प्रचंड वर्दळ असते. विशेष म्हणजे, बाजुलाच प्रसिद्ध कळमना मार्केट आहे. त्यामुळे देशातील विविध प्रांतातूनही येथे मोठ्या प्रमाणात ट्रक तसेच अन्य मालवाहू वाहने येत असतात. अशा या ठिकाणी रेल्वेचे विकास काम सुरू आहे. १ ऑगस्टपासून तेथील विकासकामांचा विस्तार होणार असल्याने हे फाटक बंद राहिल, अर्थात या मार्गावरची वाहतूकही १ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत बंद राहिल, असे दपूम रेल्वे प्रशासनाने जाहिर केले होते. तसा फलकही या फाटकावर लावला होता. प्रत्यक्षात आज ३ ऑगस्ट असूनही हे फाटक सुरूच आहे. तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूकही सुरू आहे. एका जागरूक नागरिकाने आज रात्री त्याचा व्हिडीओ काढून लोकमतला पाठवला आहे. त्यामुळे दपूम रेल्वे प्रशासनाचा कारभार नव्याने चर्चेला आला आहे.