नागपूर: ‘सोशल मीडिया’वरून पसरविण्यात येणाऱ्या अफवा व फेक न्यूजचा शोध घेत त्यांच्यावर नियंत्रण आणण्यात नागपूर पोलिसांच्या ‘गरुडदृष्टी’ प्रकल्पाला चांगले यश मिळाले आहे. ‘सोशल मिडिया मॉनिटरिंग’ व ‘सायबर इंटेलिजन्स’ साठी काम करणाऱ्या या प्रकल्पाचा राज्याच्या इतर जिल्ह्यांतदेखील विस्तार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रविवारी पोलीस भवनात या प्रकल्पाचे सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, राजेंद्र दाभाडे, शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त लोहित मतानी हे प्रामुख्याने उपस्थित होते. काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. शिवाय आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशातून चालतात.
सायबर फसवणुकीपासून सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. या जगात कुठलीही गोष्ट मोफत मिळत नाही, की कोणाला घरबसल्या लॉटरी लागत नाही. त्यामुळे समाज माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या प्रलोभनांना , अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. ‘एआय’चा वापर करून सायबर गुन्हेगार डिजिटल अरेस्टची भिती दाखवत लुबाडणूक करत आहेत. मात्र सायबर गुन्हेगार कुठली ना कुठली ‘डिजिटल फूटप्रिंट’ सोडतोच. त्या माध्यमातूनच त्याचा शोध पोलीस घेत आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वेळेत तक्रार केली तर मिळतील पैसेआरोग्यासाठी जसा गोल्डन अवर महत्वाचा असतो, तसेच सायबर, ऑनलाईन फसवणूकीतही गोल्डन अवर महत्त्वाचा ठरतो. सायबर शाखेकडे लगेच दाद मागितली तर झालेल्या व्यवहारानंतर बँक खाते गोठवता येते. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर १९३० किंवा १९४५ क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
या पिडीतांना मिळाली फसवणूकीची रक्कमरोहित अग्रवाल (७३ लाख), शशिकांत परांडे (३४ लाख), देवीदास पारखी (३५ लाख), विजय पाठक (१९ लाख), विजय मेघनानी (१९ लाख), देवेंद्र खराटे (१२ लाख), राजमनी अजय जोशी (२९ लाख), राहुल चावडा (१५ लाख), बुद्धपाल बागडे (१० लाख), आदित्य गोयंका (२६ लाख), संगिता आष्टनकर (८ लाख)