शिवसेनेतील पहिली फूट अन् नागपुरातील भुजबळांचा शपथविधी

By Shrimant Mane | Updated: December 14, 2024 11:35 IST2024-12-14T11:34:18+5:302024-12-14T11:35:16+5:30

Nagpur : सहा उपमंत्र्यांनीही घेतली होती शपथ

The first split in Shiv Sena and Bhujbal's oath-taking ceremony in Nagpur | शिवसेनेतील पहिली फूट अन् नागपुरातील भुजबळांचा शपथविधी

The first split in Shiv Sena and Bhujbal's oath-taking ceremony in Nagpur

श्रीमंत माने 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
रविवारी, १५ डिसेंबरला नागपूरमध्ये होणारा महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असेल. तेहतीस वर्षांपूर्वी, डिसेंबर १९९१ मध्ये शिवसेनेच्या पहिल्या बहुचर्चित फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ व डॉ. राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखी पाच मंत्र्यांनी नागपूरमध्ये पहिल्यांदा शपथ घेतली होती. यानिमित्ताने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीन दशकांपूर्वीच्या शपथविधीच्या आठवणींना 'लोकमत'शी बोलताना उजाळा दिला.


कॅबिनेट मंत्री भुजबळ तसेच बुलढाण्याचे डॉ. गोडे यांच्यासोबत अमरावतीच्या वसुधाताई देशमुख, आमगावचे भरत बाहेकर, ठाण्याचे शंकर नम, बीडचे जयदत्त क्षीरसागर व धुळ्याच्या शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी २१ डिसेंबर १९९१ रोजी नागपूरमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. स्व. सुधाकरराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळीच ५ डिसेंबर १९९१ रोजी शिवसेनेतील पहिल्या फुटीचे महाभारत घडले होते. वर्षभर आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. १४१ आमदारांचा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या वाट्याला आले. मनोहर जोशी यांच्या नावाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौल दिला. त्याचवेळी मंडल आयोगाचा मुद्दा देशपातळीवर ऐरणीवर आला होता. भुजबळांनी त्या मुद्द्यावर बंड केले.


त्याबद्दल भुजबळ सांगतात, आधी शिवसेनेचे तब्बल ३६ आमदार आपल्यासोबत होते. तथापि, बाळासाहेबांच्या भीतीने नंतर १८ उरले. प्रत्यक्ष बाहेर पडताना बाराच शिल्लक राहिले. ही संख्या एकतृतीयांशपेक्षा कमी होती. म्हणजे आपली आमदारकी गेली, असे समजून आम्ही निराश झालो. बाळासाहेब व शिवसैनिकांच्या भीतीने आम्ही लपून होतो. सगळ्यांच्याच जिवाला धोका होता. तथापि, कसेबसे वाचलो आणि मी व डॉ. गोडे यांनी इतरांसोबत शपथ घेतली. मला महसूल, तर उपमंत्री डॉ. गोडे यांना गृहखाते मिळाले. माझी इच्छा गृहखात्याच्या कॅबिनेटची होती. परंतु ते मुख्यमंत्र्यांकडेच राहते, असे सुधाकरराव म्हणाले. मुंबईचा महापौर असल्याने नगरविकास ही दुसरी पसंती होती. पण, ते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते. अखेर गावखेड्यातून आलेल्या समर्थकांच्या सूचनेवरून महसूल स्वीकारले. ते आधी शंकरराव कोल्हे यांच्याकडे होते.


मधुकरराव चौधरींचा ऐतिहासिक निवाडा 
शिवसेनेतील या फुटीसंदर्भात तत्कालीन विधानसभाध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे महत्त्व मोठे होते, असे सांगून छगन भुजबळ म्हणाले की, आपल्यापुढे आलेल्या आमदारांची संख्या १८ म्हणजे शिवसेनेच्या फुटीर गटाला मान्यतेसाठी पुरेशी होती. त्यातील ६ नंतर फुटले तर ती संख्यादेखील एकतृतियांशपेक्षा अधिक असल्याने कोणीही अपात्र ठरत नाही, हा निकाल चौधरींनी दिला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शिवसेनेचे आक्रमक आमदार अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. मधुकरराव चौधरींच्या जिवाला धोका निर्माण झाला. तेव्हा, तुम्हाला मला मारायचे असेल तर मारा; पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असे बाणेदार उत्तर चौधरी यांनी दिले. नंतर त्यांचा हा निर्णय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला

Web Title: The first split in Shiv Sena and Bhujbal's oath-taking ceremony in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.