नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; आराखडा सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 23:59 IST2025-07-16T23:59:05+5:302025-07-16T23:59:46+5:30

शासकीय मुद्रणालयाच्या जागेवर १४ मजली प्रशासकीय इमारत, तर विधानभवनाच्या जागेवर सात व सहा मजलीच्या दोन इमारती होणार

The face of Nagpur's historic Vidhan Bhavan area will soon change; plan submitted | नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; आराखडा सादर

नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; आराखडा सादर

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवन परिसराचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तारीकरण व नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण बुधवारी मुंबईच्या विधानभवनात करण्यात आले.

“हे काम भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक वैभव टिकवून ठेवणारे असावे,” अशी स्पष्ट अपेक्षा नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदी उपस्थित होते. आराखड्याची रूपरेषा प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी सादर केली.

नागपूरमधील सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्याची भव्य इमारत उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहिल याची काळजी घेण्यात येणार आहे. विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत सेंट्रल हॉल, विधानसभा, विधानपरिषद सभागृह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, विरोधी पक्ष नेते यांचे दालन आदी असणार आहेत. तर शेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी वेगळी सहा मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच वाहनतळ, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष आदी सुविधा असणार आहेत. तर शासकीय मुद्रणालयाची जागा विधीमंडळास मिळाली असून या जागेवर मंत्रालयीन प्रशासकीय कार्यालयांसाठी सुमारे चार लाख चौ.फुटाची चौदा मजली भव्य दिव्य अशी इमारत उभारण्यात येणार आहे.

नागपूरमधील विधानभवनाच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाच्या मार्फत करण्यात येणार आहे. महामंडळाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

दोन्ही परिसर भुयारी टनेलने जोडणार

शासकीय मुद्रणालयाच्या जागेवर विधिमंडळाची प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. विधानभवन परिसर व प्रस्तावित प्रशासकीय इमारत यांना भुयारी टनेलने जोडण्यात येणार आहे.

विधानभवनाचे विस्तारीकरण करताना ‘हरित इमारत’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी. अभ्यागतांसाठी आरामदायी जागा व उपहारगृहाची सुविधा आवश्यक आहे.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: The face of Nagpur's historic Vidhan Bhavan area will soon change; plan submitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.